27/03/2026
नाट्यारम्भे.....
जेव्हा जेव्हा रंगभूमीचा हा पडदा
असा उघडतो तेव्हा तेव्हा मनात काय
होते हे आठवतंय ना ?
बंद पडद्याच्या अलीकडे म्हणजेच रंगमंचावर असतात ते कलाकार आणि पलीकडे असतात ते रसिक जन...
इंग्रजीत butterflies in tummy असं एक विधान आहे. मनात असंख्य रंगीबेरंगी भावनांची फुलपाखरं उडत असतात.
एकाच क्षणी "आजचा कार्यक्रम छान होईल ना?"अशी भीती आणि "का नाही होणार ?होणारच!!!!" असा आत्मविश्वास...
एका बाजूला "अमुक अमुक गोष्ट नीट होत नव्हती आज मला ती छान येईल ना ? लोकांपर्यंत पोहोचेल ना?" अशी काळजी तर दुसऱ्या बाजूला "आपण काहीतरी छान लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत याचा सविनय आत्मविश्वास.."
हा असा गोंधळ का बर होतो? कारण त्यामागे असते जबाबदारीची जाणीव.
कोणतीही कला आपल्याला निस्सिम आनंद देतेच, परंतु तिच्या सादरीकरण करताना काही नियम पाळावे लागतात, शास्त्र समजून घ्यावं लागतं, त्या त्या शैलीची सौष्ठव संपन्न अशी बांधणी असते. या सगळ्या गोष्टी सांभाळणे, संगीत-साहित्य-अवकाश-प्रकाश या सगळ्याचा आनंद घेणे, पण त्याचबरोबर स्वतःच अस्तित्व विसरणे ज्यायोगे आपण रंगवत असलेलं पात्र सशक्तरित्या रसिकांपर्यंत पोहोचेल.
ह्यामागे अनेकानेक वर्ष आपल्या गुरुंनी आपल्यावर घेतलेली मेहनत असते. आपल्या परिवाराचा विश्वास असतो. तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सगळ्यांचं सहकार्य असतं. सहकलाकारांना सांभाळून घ्यायचं असतं. या सगळ्या सगळ्यातून मार्ग काढत कलाकार खरंतर स्वतःचा शोध घेत असतो.
धाकधूक, घालमेल, उत्साह, आनंद, भीती, काळजी, जबाबदारी, प्रेम .... सगळं सगळं अगदी उत्कटपणे जाणवत असतं पण मन शांत ठेवून, नटराज चरणी स्वतःला अर्पण केलं की आपसूकच रंगभूमीच जणू देवालय असल्याचं जाणवतं...
रंगमंचाचा पलीकडे, म्हणजेच रसिक प्रेक्षकांना, हे सगळं जाणवतं ना हो????
रंगमंचाच्या अलीकडे आणि पलीकडे असणाऱ्या सगळ्यांनाच जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा
प्रज्ञा गोरे
#जागतिकरंगभूमीदिन