21/06/2026
जिद्दीचा पायमोजा✨
कपाळावरती आट्या, पाठीला थोडा बाक,
पण नजरेत अजूनही स्वाभिमानाची धाक.
वय वर्ष एकशे तीन, हात थोडे काजळलेले,
उन्हातान्हात बसून आजोबा पायमोजे विकत होते.
सभोवताली दुकाने होती, उनाड आणि भकास,
ग्राहक राजा येईल म्हणून, लावून बसलेली आस.
इथे आजोबांच्या चेहऱ्यावर, थकवा नव्हता जराही,
'यूपीआय' अन 'डिजिटल'चं, त्यांना भान नव्हतं काही.
वयाचा तो आकडा ऐकून, मनात आदर दाटला,
नतमस्तक होऊन त्यांना, सलाम करावा वाटला.
पण व्यवहार तो व्यवहार, तिथे भाव-तावाचा खेळ झाला,
आपल्याच माणसाशी जिंकण्याचा, खरा प्रताप तिथे नडला.
घासाघिस करून शेवटी, त्यांनी योग्य भावातच विकले,
कष्टाचे ते चार पैसे, त्यांनी स्वाभिमानाने राखले.
मी म्हणालो, "आजोबा, कशाला करता एवढी घाई?
या वयात एवढी धमक, तुम्हाला परवडत तर नाही!"
आजोबा हसले हळूच, डोळ्यांत चमक होती भारी,
म्हणाले, "पोरा, बसून खाण्यापेक्षा, कष्टाचीच चव लय न्यारी!"
जिद्द, चिकाटी, निरंतर कष्ट, त्यांच्याकडून मी शिकलो,
१०३ वर्षांच्या त्या तरुणासमोर, मी स्वतःला अगदी लहान समजलो.
YA 🧦♥️