03/09/2024
राज्याच्या विकासात पर्यटनाचे महत्व बादशहा ओळखून होता. आपल्या राज्यात पूरातन मंदिरे आहेत, जैवविविधतेने नटलेली अभयारण्ये आहेत , निळे समुद्रकिनारे आहेत , जागतीक वारसास्थळे आहेत , हिलस्टेशन आहेत तरी सुद्धा जागतीक पर्यटकांचा ओढा म्हणावा तसा तिकडे वळत नाही याचे त्याला सखेद आश्चर्य वाटे ! यावरच चर्चा करण्यासाठी त्याने बिरबालाला बोलवले आणि रात्री डिनर घेताना त्याच्याशी बोलण्याचा बेत आखला . बिरबल जेवायला येणार म्हणून बादशहाच्या बेगमने स्वतः लक्ष घालून स्वयंपाक बनवला . त्याचा सुगंध राजवाड्यावभर दरवळत होता . बिरबल ठरल्यावेळी पोहचला . बेगमने सोन्याच्या ताटात चंदनाच्या टेबलावर दोघांना जेवायला वाढले . विविध प्रकारच्या चटण्या , लोणची, भाज्या, गोड व तिखट पक्वान्न असे बापन्न पदार्थ जेवणात होते. बादशहा आणि बिरबल जेवायला बसले . बेगम जातीने हवे नको पहात होती . पण प्रॉब्लेम् असा होता की बिरबलाला जोरात लघुशंका लागली होती त्यामुळे त्याचे जेवणात लक्ष लागत नव्हते . बिरबलाचे जेवणात लक्ष नाही हे बादशहाच्या लक्षात आले . "बिरबला, काय खाल्लं की सगळ्यात छान वाटतं ? बादशहाने भला मोठा गुलाबजाम तोंडात टाकत विचारले ! बिरबलाचे लक्ष नव्हते . त्याला वाटले बादशहा विचारतोय काय केले की सगळ्यात छान वाटते? तो पटकन बोलून गेला " एक नंबरला (लघुशंका ) गेले की सगळ्यात बरे वाटते ! " बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहाचा पारा चढला. बेगम तरातरा निघून गेली . बिरबलाला आपली चूक कळली पण आता स्पष्टीकरण देण्यात अर्थ नव्हता !
बादशहा बिरबलावर नाखुष आहे ही बातमी संपूर्ण दरबारात पसरली . त्याचे हितशत्रू खुष झाले . बादशहाला मात्र आंतरराष्ट्रीय पर्यटक का येत नाहीत, या त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही .
असेच काही दिवस निघून गेले . बादशहाने हवा
पालटासाठी कुठेतरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. नेहमी प्रमाणे बिरबलाने सर्व व्यवस्था केली . तो बादशहाला घेऊन एका छान बीच वर गेला . निळा समुद्र आणि नारळाची बाग बघून बादशहा खुष झाला . शहाळेवाल्याने त्याला एक छान शहाळे फोडून दिले . ते अवीट गोडी असणारे पाणी पिऊन बादशहा तृप्त झाला . आपल्या बागेत खुद्द बादशहा आलाय म्हणल्यावर तर त्या शहाळेवाल्याला आकाश ठेंगणे झाले ! त्याने आग्रहाने बादशहाला अजून एक शहाळे दिले आणि देताना एक सेल्फी काढला ! तो सेल्फी त्याने स्टेटसला ठेवला आणि बादशहा आल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली . योजक वाले भीडे त्यांचे प्रसिद्ध जीरे घातलेले कोकम सरबत घेऊन आले . खरे तर दोन शहाळी पीऊन बादशहाचे पोट तुडुंब भरले होते पण कोकम सरबताचा तो आमसूली रंग आणि आंबटगोड चव दोन्ही आवडत्या गोष्टी ! यामुळे तो कोकम सरबताला नाही म्हणून शकला नाही . ते पिऊन होते न होते तोच सर्वोत्तमचे गोखले कैरी पन्हे घेऊन आले . वेलचीचा स्वाद आणि गोड आग्रह यामुळे बादशहाला ते देखील प्यावे लागले! आता तर त्याला एक नंबरला जायचे होते पण तेवढ्यात कोळथऱ्याहून आगोमचे अण्णा महाजन करवंदाचे सरबत घेऊन आले ! त्यांनी करवंदाचे औषधी गुणधर्म असे काही सांगितले की बादशहा करवंद सरबत पिण्यावाचून स्वतःला रोखू शकला नाही . पण आता त्याची अवस्था बिकट झाली . एक नंबरची सोय कुठे आहे असे त्याने विचारले पण बिरबल काही उत्तर देणार एवढ्यात पावसचे देसाई गुठळी युक्त आमरस घेऊन आले . आता आमरस म्हणजे बादशहाचा वीक पॉईंट ! पण पोटात थेंबभर पण जागा नव्हती! बादशहा बिरबलाला म्हणाला आधी वॉशरूम कुठे आहे ते दाखव . बिरबल म्हणाला , "बादशहा इथे कुठेच वॉशरूम नाही ! " "अरे मग इथे एवढे हजारो पर्यटक येतात ते जातात कुठे ? "
"असेच एखाद्या झाडाच्या आड किंवा रस्त्याकडे पाठ करून उभी रहातात ! " बिरबल म्हणाला!
"अरे , सार्वजनीक स्वच्छतागृह तर असेल ना ?" बादशहा कडाडला!
बिरबल शेवटी त्याला सार्वजनीक स्वच्छता गृहात घेऊन गेला . त्याची अवस्था दयनीय होती . लादीचे कळपे उडाले होते . आतील पाण्याचे ओघळ रस्त्यापर्यंत पसरले होते . भयानक दुर्गंधी पसरली होती . पण बादशहाचा संयमाचा बांध अगदीच फुटत आला होता. आणखी थोडावेळ त्याने स्वतःला रोखले असते तर अतिप्रसंगच घडला असता .
कसाबसा त्याने आपला शरिरधर्म उरकला . बाहेर आला आणि बिरबलाला म्हणाला "आता सगळ्यात छान वाटतंय "
बिरबलाने स्वतःच्या याच उत्तराची बादशहाला आठवण करून दिली .
बादशहा म्हणाला "मला ऐकवायची एकही संधी तू सोडू नकोस ! "
बिरबल नम्रपणे म्हणाला "बादशहा , तुम्हाला ऐकवण्यासाठी नाही पण हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे ! आपल्याकडे समृद्ध पर्यटन स्थळे आहेत हे खरे आहे पण त्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृह ही प्राथमिक सुविधा पण नाही ! विचार करा अशावेळी बायामाणसांची काय अवस्था होत असेल ? जायला चांगले रस्ते नाहीत की पार्किंग नाही. बाकी काही करण्याआधी एवढ्या प्राथमिक सुविधा जरी दिल्यात तरी पुष्कळ पर्यटक येतील !"
बिरबलाचे म्हणणे बादशहाला पटले त्याने लगेच पर्यटन मंत्र्यांना योग्य ते आदेश दिले .
वैभव सरदेसाई
प्राचिन कोकण , म्युझीयम गणपतीपुळे ।