17/10/2025
वसुबारस
-------------
गौरव सु.सोनसळे, पुणे
विजापुरात दुपार रापत होती. आकाश निळ्या पाषाणासारखं कठीण झालेलं, वाऱ्याला उष्णतेचा धूर लागलेला. शहाजी राजांच्या वाड्याच्या बाहेर शिऊबा एकटेच बाहेर पडले. महाराज साहेब शहाजी राजांच्या इशाऱ्याने मागोमाग बाजी पासलकर गेले , कडी-कुलुपात बांधलेल्या राजकारणाच्या धड्यांतून बाहेर येऊन ते आज जगण्याचा धडा शोधत होते. पायवाटेच्या वळणावर आदिलशाही रयतेची गर्दी कुजबुजत उभी होती धुळीचा दर्प पसरलेला.
शिऊबांना आदिलशाही शहर पहायचे होते , गेले दोन दिवस त्यांनी तो हट्ट धरला होता,
अश्वशाळेतून 'श्रीमंत' नावाच्या घोडयावर मांड टाकली ,
काही वेळाने विजापूरच्या मार्गात शिऊबांनी घोडा थांबवला. त्यांच्या मागे बाजी काकांनी आणि दोन चार हुन्नर दाखवलेल्या मावळ्यांनी आपला घोडा थांबवला , धूळ माती हळू हळू बसती झाली
लोक स्वतःहून बाजूला झाले. पुढे दृश्य उघडलं—गाय आडवी, पाय दोरखंडांनी जखडलेले, डोळ्यांत मातृत्वाचा दाह. तिचं फुरफुरणारं नाक जणू धरेचा थरथरता श्वास; तिच्या अंगावर घोंगावतं भय संध्याछायेचा थर. वर उभा कसाई, अंगावर निर्दयतेचा अलंकार चढवून होता त्या क्षणी शिऊबांच्या अंतरी काहीतरी तुटलं नाही—उलट अखंड होऊन उभं राहिलं. करुणेचा तेजोबिंदू एकदम धगधगता अग्निबाण झाला, बाल छातीचा भाता फुगला , धूसमुसला.
कंबरेची तेग म्यानातून वीजेसारखी सपकन निघाली. फक्त आवाज नव्हता— सत्याचा एक लख्ख प्रकाश चकमकला. क्षणभर काळ थांबला. पुढच्या क्षणी गुडघ्यांवर रुतलेल्या अन्यायाचा हात सुन्न दगडासारखा जमिनीवर पडून राहिला. बांधलेल्या दोरावर तेगीची किनार लागली , दोर तुटला , गाय थरथरून उठली; तिच्या डोळ्यांत कृतज्ञतेची जळजळती ओल आलेली. त्या नजरेनं शिऊबांच्या हृदयाला प्रसादाचा स्पर्श केला.
सभोवताली निःशब्दता दाटली. पानं हलली; त्यांच्या झुळुकीत काळाने पुटपुटलं—“धर्माचा पहिला पहारेकरी जागा झाला.”
वाड्यात बातमी पोचली तेव्हा दालनात नकाशे, पत्रं, हिशेब—सगळं पसरलेलं; पण शहाजी राजांचे डोळे कागदांआडून भेदून दूर गेले. दूताने घडलेलं सांगितलं. राजांच्या कपाळावर क्षणभर रेष उमटली—शिस्त, कायदा, नियंत्रण. पुढच्याच क्षणी ती रेष स्मिताच्या शांत पावसात विरली.
“सुकुमार अजून कळत-नकळत वयात… पण नसांत घराण्याचा ज्वालागंध आहे,” मनातली विचारसर जणू स्वतःच ऐकू आली. “धर्म जखमी झाला तर तलवारीचा स्पर्श औषध असतो. दया जर आर्त झाली, तर धैर्य तिचा हात धरून उभं करावं लागतं.”
राजांनी दीर्घ श्वास घेतला. दूरवर कुठेतरी न दिसणाऱ्या आकाशाशी ते बोलले—"हा हात आज गायीचे प्रतिपालक ठरत आहात, उद्या प्रजापालन देखील व्हा , जगदंबा तुम्हास बळ देईल”
महाली संध्याकाळ उतरत होती. गोठ्यातल्या घंट्यांचा मंद नाद होता, तेलदिव्याच्या ज्योतीवर भगव्याचा सूक्ष्म तुरा फरफरत होता. दूत शब्द मोजून सांगत होता; जिजाऊ शांत ऐकत होत्या. त्यांचे डोळे मिटले. पापण्यांच्या अंतरमहालात दोन प्रतिमा उभ्या—एक, आर्त गाय; दोन, कठोर निश्चयाने स्थिर उभा कुमार.
“गाय म्हणज माता, गोपालकृपेची प्रतिमा,” त्यांच्या मनात शब्द न शब्द उगवत गेले. “ज्याने तिचा प्रतिपाल केला, त्याने धर्माची हाडं सांधली.” अश्रूची थेंब ज्वालेवर टिपला—ज्योत क्षणभर उंच झेपावली
"सिंहराज" त्या मनात म्हणाल्या, “तुझ्या हातात तलवार असू दे; पण तिचं टोक नेहमी करुणेकडे वळलेलं असू दे. अन्यायावर वार करणारी धार—आणि रयतेच्या अश्रूंना पुसणारी मूठ अशीच ठेवा ”
त्यांच्या मनाच्या कवाडांना दिसू लागला नृसिंह.
काळ सरकला. चिंचवडच्या देवकळ्यात मोरया गोसावी आसनस्थ झालेले . कंदिलाची मंद ज्योत हळुवार डोलत होती—जशी नदीच्या पाण्यावर आभाळाची तारे पडून थरथरतात. त्यांच्या हस्तात पत्र—शिऊबांचे अक्षरं स्पष्ट, पण प्रत्येक अक्षरात तपश्चर्येचा त्याग होता.
ओळ वाचताना ते थबकले—“गायीचा प्रतिपाल केलिया बहुत पुण्य आहे.” शब्द नव्हते, मंत्र होते. त्या एका वाक्यात फार आधी ऐकलेला काळाचा गाभा दाटला , विजापूरची अंगारी दुपार, गाईचा आर्त श्वास, तलवारीची निःशब्द वीज, आणि नजरेतला प्रसाद.
गोसावींच्या अंतरी एक सावकाश प्रतिध्वनी घुमला—“जो गाईचा रक्षक, तोच रयतेचा पालक. जो करुणेला कवच देतो, तोच धर्माला कणखर कणा देतो.” त्यांनी नेत्र मिटले; अंतर्मनात गोकुळाची सावली, वादळात गोवर्धन उचलणारा करुणावतार, आणि सह्याद्रीवर उगवणाऱ्या एका बाल राजाचा तेजोभास एकवटला, तो दिवस वसुबारसेचा होता
कंदिलाची ज्योत पुन्हा उंच गेली. वाऱ्याने धूपाचा सुवास पसरवला. त्या सुगंधात काळाने आपल्या काळया काळात सुवर्णी शिलालेख कोरला—
“देव देश आणि धर्म"
-------
सदर कथा काल्पनिक आहे , इतिहासात महाराजांनी गोमातेसाठी कसायाचा हात कापल्याचा उल्लेख अथवा पुरावा नाही ! परंतु “गायीचा प्रतिपाल केलिया बहुत पुण्य आहे.” हे महाराजांचे विचार आहेत ह्या बद्दल पुरावा आहे.
जय शिवराय !
शुभ दीपावली! ✨🪔
#गौरव_सोनसळे