Kalakar katta

Kalakar katta it is all about loving the art

24/10/2023

रंगभूमीचे पाईक आणि सर्वार्थाने त्याचे सेवक हे नेहमी विनयशील आणि इतरांच्या कामाचं कौतुक करणारे मदत करणारे आणि सतत प्रयोगशील असतातच!
मग का बरं हे असं दुसऱ्या बाजूने नको ते उद्योग लोक करत असतील.बरं त्यातून त्यांना काय मिळत असेल?
ते म्हणतात आम्ही प्रयोग करतो आम्ही जगणं मांडतो आम्ही झगडतो आम्ही प्रेरणादायी सकारात्मक काहीतरी करत राहतो आणि दुसऱ्या बाजूला द्वेष तिरस्कार गटबाजी आणि चिडचिड असले थुकराट उद्योग होत राहतात.चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक कायम असतात या वाक्याची दरवेळी नव्याने ओळख होते.
स्ट्रगल हा शब्द प्रत्येकवेळी नव्या वळणावर आणि नव्या टप्प्यावर भेटत / भिडत असतो.
प्रत्येकाचा जन्म पहिले येण्यासाठी नाही झालाय
कुणीतरी दुसरं यायला हवं तर पहिलं येण्याला किंमत आहे
तेव्हा नाटक हा विषय स्पर्धेत पहिलं येणं यासाठी नाहीच! तो तुम्हाला निश्चित प्रगल्भ बनवतो जसे जसे आपण त्यात मुरत जातो
नुसतं नाटकच नाही तर हर एक कलेची अभिव्यक्त होण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते
तेव्हा काही जणांना नाटक पाहून काहींना त्यात काम करून काहींना फक्त त्या सर्कल मध्ये नुसतं राहूनही छान वाटतं
मुद्दा काय आहे-
त्यातून तुम्हाला हवं तसं समाधान आणि आनंद मिळाला पाहिजे
आणि त्यासाठी प्रधान विचार जो आहे तो दरवेळी वेगवेगळा आहे,त्याला कस्टमाईज्ड म्हणा हवं तर!
जसं माणसाचा सदा सर्वकाळ एकच मूड नसतो अगदी तसंच पुढच्या प्रयोगात तेच नाटक वेगळंही दिसू शकतं कारण कोणत्या मूड मध्ये ते पाहिलं त्याने फार फरक पडतो
दुसरा विचार असाय की
फक्त नाटक नाटक काय चाललं आहे
तुम्ही त्यात काम करता त्याच्याशी संलग्न आहे म्हणून त्याची इंटेनसिटी जास्त असते इतकंच!
नाटकातून इतर विषयावर सुद्धा असं आशय संपन्न अभ्यासपूर्वक बोलता यायला हवं आणि नुसतं बोलणंच कशाला कृतीही करता यायला हवी!

तुम्हाला वाटते ती ऍक्टिव्हिटी करताना contunity कायम असेल तर खूप काही अजून नवीन गवसेलच!
पण तीच एक पद्धत तोच एक मार्ग आहे असं नाही!तिथेही प्रयोगशील राहिलं आणि quality वेळ दिला की अजून नवं काहीतरी निश्चित मिळेल.

नाटक म्हटलं की त्याचे प्रयोग होणं हे मस्ट आहेच
पण काही बेसिक ग्राउंड फंडामेंटल कृती म्हणजे जसा इतर कलांमध्ये सराव असतो तसा भाग म्हणजे नाटकासाठी होणारी तालीम.
दोन वर्षे झाली मी तालमी पाहणं बंदच केलंय एकदम
कारण सराव म्हणून कुठेही तालीम होत नाही त्यासाठी त्यांनी वर्कशॉप हे नाव फायनल केलंय आणि ते सहा महिन्यांनी वर्षांनी मुलं किती आणि बॅच कितीची आणि किती पैसे मिळतील या विषयाभोवती फिरून बंद होतं
त्यातूनही नाटक उगवंतच पण ते अगदी रॉ स्वरूपाचं असतं आणि त्यावर पुन्हा मेहनत घ्यायची म्हणजे डायरेक्ट पुढचं वर्कशॉप!!
तर मुद्दा असाय तालीम किंवा सराव म्हणून प्रयोग नसताना कलाकार मंडळी अर्थात नट नटी मंडळी कसले सराव करतात? इतरांची नाटक कला पाहतात का?
की आपण जिंकलो.. हे पारितोषिक जिंकलं.. करंडक
किंवा प्रयोगात मिळालेली दाद यांच्या बेसवर फक्त गप्पा मारतात?
बऱ्याचदा मी करवून घेतलेल्या तालमी यांची बऱ्याचदा चर्चा काही नाटकातली मंडळी करत असतात!त्यात कुणाला मी कसं फटकवलं
कशी वेळेवर न आलेल्यांची हकालपट्टी केली याचे किस्से रंगवून रंगवून सांगतात. आणि तशा तालमी करा म्हणून सुचवतात खरे पण त्यातलं प्रत्यक्ष तालमीला काहीही घडत नाही.
सब चलता हैं शेवटी प्रयोगात नीट कर म्हणजे झालं अशी एक मानसिकता आहे आणि सगळ्या कसोट्या अंदाज परिणाम शेवटी तिथल्याच कामावर अवलंबून असतं!मग तालमी लागतात कशाला? थेट प्रयोगातच कळतं कुठे आणि कशी माती खाल्लीये ती!
असे कितीसे पैसे लागतात नाटक शिकण्यासाठी?
प्रश्न अत्यंत गंभीर असला तरी तितकाच थुकरट आहे
गेला पावसाळा जे- नाटक प्रायोगिक स्टेज फुटर वाचिक अभिनय यात अडकले होते त्यांनी पुढच्याच उन्हाळ्यात स्वतःचे काय ते ऍक्टिंग कलासेस काढले आणि मोठ्या हौसेने तिथे - जो विषय मुळात त्यांना नीटसा कळलेला नाही आणि जो कळताना बऱ्याच अडचणी आल्या त्या दोषासकट त्यांनी बिनबोभाटपणे तो विषय स्वतः चा शोध म्हणून पुढे पोचवलाही आहे! आणि याच विषयाची मला नेहमी गंमत वाटत आली आहे.
बरं ज्यांनी स्वतःची शाळा नीट शिकलेली नाही त्यांनी त्या स्वतःच्या अर्धवट शाळा सोडून इतरांसाठी अभिनयाची कॉलेजेस वगैरे काढू नयेत का? तर जरूर काढावीत! आणि त्याचे प्राचार्य की काय ते व्हावं , गावभर कॉलेज टाकलंय म्हणून त्याच्या जाहिराती कराव्यात , त्यातून भरपूर डोनेशन घेऊन अर्धी मुर्धी समजलेली विद्या जमेल तितकी पसरवावी आणि सोनं लुटावा तसा तो आनंद लुटावा.
कारण कुणाला तरी लुटण्यासारखा दुसरा असुरी आनंद जगात नाही!
आणि थोडं तपशीलात बोलायचं झालं तर इथे प्रमाण नाटक समजतं कोणाला? आणि जरी समजलं तरी कुणाला करता कुठे येतं? तसे सगळे विद्यार्थीच!
आणि परिक्षेचीही भानगड नाहीये फारशी! NSD/ललित किंवा तत्सम टॅग लावून ओ का ठो न समजणारेही महाभाग पैशांच्या वशील्याच्या जोरावर नको त्या ठिकाणी पोचलेले दिसत असतातच की!
बाकी स्ट्रगलर्स सुद्धा एकांकिका स्पर्धा या गोंडस चॉकलेट च्या अमिषापोटी वाट्टेल तितके जमतात! संधी की काय ते मिळते म्हणून अत्यंत हिडीस डायलॉग आणि पांचट जोक्स ना पॉट फाटेपर्यंत रडतात-हसतात! आणि इथली नाट्य संस्कृती की काय ते जोपासतात.
मूळ प्रश्न अजूनही तसाच आहे!
मला वाटतं इथे नाटक शिकवलं नाही जात तर ते समजावून सांगितलं जातं-शेवटी समजून तुझं तू शिक ब्वा असं आहे ते!
म्हणजे एकलव्य हा आदर्श गुरू आहे नाटकासाठी! मग फक्त समजून घेण्यासाठी काही शे पण पुरेसे असतात! मग काही हजार आणि आणि काही लाख याची गणिते थेट का नाही सांगितली जात आहेत!
एखाद्याचा मानसिकतेशी पैशांचे आकडे फुगवून खेळणं हाही भ्रष्टाचारच आहे!
बरं शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला काय येतं यासाठी म्हणून परीक्षा घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट देते की तुम्ही उत्तम/ बरे /वाईट शिक्षण घेतले आहे आणि त्या सर्टिफिकेट ला प्रमाण मानून तुम्हाला बरी /वाईट नोकरी मिळते.
तसं नाटकाची वर्कशॉप अकॅडमी सर्टिफिकेट काय मिळवून देतात?
आणि सगळ्या ठिकाणी फी वेगवेगळी का आहे?
जे सर वगैरे आहेत ते फी घेतात चोख तुम्हाला शिकवण्याची!मग तुम्हाला काही येत नसेल तर त्याची जवाबदारी ते घेतात का? आणि घेत असतील तर ते किती दिवस घेतात? घेत नसतील तर का नाही घेत? पुण्या मुंबईतच फक्त असे क्लासेस धोधो का चालू आहेत?
बाकी सगळे तिकडे धुळे, अमरावती, नाशिक, अहमदनगर , सोलापूर वगैरे ठिकाणी लोकं काय करत आहेत?
आता फक्त शिक्षणच घ्यायचं म्हणून युनिव्हर्सिटी आहेत प्रत्येक जिल्ह्याला मग तिथे ही नाट्य प्रशिक्षण शिबिरे जोमाने का होत नाहीयेत? अनुभवी लोकांना बोलावलं तर कुणी नकार देतंय का?
नाट्य चळवळ म्हणून असे अनेक प्रश्न उभे आहेत ज्याची उत्तरे आणि मार्ग प्रत्येक रंगकर्मी साठी अत्यंत मार्गदर्शक आहेत मग त्यावर एकच दिवस का? रोज थोडं थोडं बोलायला हवं! आणि ते प्रत्येक रंगकर्मीने बोलायला हवं!
प्रत्येक 'हे असं का,?' याला निश्चित एका वाक्यात असं उत्तर नाहीये पण जवळपास पोचणारं असं साधन सुद्धा नाहीये!

थिएटर करणारे नाटकाच्या अनुषंगाने बऱ्याचदा प्रयोग,प्रायोगिक/व्यावसायिक/समांतर शब्दांचा वापर करत असतात.
नेमका अर्थ तरी काय असतो या शब्दांचा?
प्रयोग या शब्दाची ओळख खऱ्या अर्थाने विज्ञान शिकत असताना झाली होती.
एक प्रयोग अन त्याची सिद्धता स्पष्ट करण्यासाठी -
प्रयोगाचा उद्देश ठरवावा लागतो मग साहित्य गोळा करून,कृती करावी लागते ,निरीक्षण करावं लागतं मग,निष्कर्ष आणि अनुमान निघतं आणि साध्य झालेली सिद्धता अर्थात प्रयोगाची वादातीत अशी सिद्धी .असा ढोबळमानाने तो प्रकार असतो त्यात अज्ञात सिद्धी भाग आहेच पण विज्ञान ते फारसं मानत नाही!पण नाटक थोडं ते मानत असावं असं वाटतं. पण हेच करून पाहणं म्हणजे नाटकाचा प्रयोग करणं असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही.
आता प्रायोगिक म्हटलं की ती प्रयोग म्हणून करून पाहायची गोष्ट आहे.
एक विज्ञान शास्त्र म्हणून या प्रायोगिकतेकडे पाहिले तर नाटकाच्या दर प्रयोगागणिक काही वेगवेगळे प्रयोग मग ते अभिनय असो पात्रांचा शोध असो तंत्रज्ञानाचा वापर असो किंवा दिगदर्शक म्हणून अगदी आऊट ऑफ द बॉक्स विचार करून काहीतरी नावीन्याने करायचं असो हे सर्व करून आजमावून पाहणे म्हणजे सादरीकरणातली प्रायोगिकताच! आणि ही प्रायोगिकता एका विशिष्ट प्रयोगसंख्येनंतर निश्चित थांबणारी असते कारण तिथे साध्य किंवा सिद्धता बदलणार नाही हे एकदा स्पष्ट झालं की त्यानंतर होणारा प्रयोग म्हणजे फक्त त्याच त्या ठरलेल्या सजीव/निर्जीव असल्या तरी तांत्रिक हालचाली होऊन राहतात. त्या असतात सुंदर पण त्यापलीकडे नावीन्य त्यात काहीच नसतं.उदा.सर्कशीत होणारे तेच ते साचेबद्ध सादरीकरण! त्या प्रयोगाला प्रेक्षक नवा असेल पण होणारा प्रयोग हा नाटककारांसाठी प्रायोगिक राहत नाही!
आता काहीजण नाटकातील प्रायोगिकता ही आर्थिक गणितात सुद्धा मोजून पाहतात ! म्हणजे प्रायोगिक ला फार कुणी येत नाही,ते आपलं छोटंसं आणि छोट्या जागेत छोट्या नाट्यगृहात होणारं चळवळीचं वगैरे एक वेगळं नाटक असतं! ते करणाऱ्या संस्थांची आर्थिक चणचण असते त्यामुळे माफक खर्चात आणि अगदी सिम्बॉलीकपणे ते मांडलं जातं.ते अनझेपेबल असतं!त्यांचे विषय कनविक्शन साठी माफक प्रॉप आणि असेट वापरतात,त्यांचा कंटेंट अबोध/दुर्बोध असतो! याच्या अगदी विरुद्ध व्यावसायिक हे भरपूर आर्थिक बजेट मध्ये लार्जर दॅन लाईफ मोठे सेट चकचकीत लाईट्स असणारं दिवाणखान्यात घडणारं हलकं फुलकं नाटक असतं. ते कळायला फार काही अभ्यासावं लागत नाही आणि त्याला बऱ्यापैकी गर्दी असते.त्यात काम करणारे मोठे स्टार सेलिब्रेटी वगैरे असतात.
या चौकटी खरंतर प्रेक्षकांनी कधी बनवलेल्याच नाहीयेत.उलट वृत्तपत्रांमधून जे छापून येत राहतं त्यावरून त्यांना हे शब्द ठाऊक झालेत.इथे असे हे शब्द वापरून समीक्षणे लिहणारे खूप महत्त्वाची भूमिका निभावत आले आहेत. भावनेच्या भरात किंवा काही रूपक सुमधुर वाचनीय समीक्षणे लिहताना असं प्रायोगिक लिहलं की जरा भारदस्तपणा येतो लेखनात.शिवाय एक नाटककार दुसऱ्या नाटककाराशी बोलताना असं प्रायोगिक वगैरे बोलला की बरं वाटतं जरा! दोघेही खुश-नाटकातलं काहीतरी कळतंय बरं का असा एकमेकांविषयी समज व्हायला ते बरं पडतं जरा!
व्यावसायिक नाटकात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये व्यावसायिक सफाईदारपणा असतो म्हणजे प्रायोगिक वाले तसे नसतात का?
तर व्यावसायिक नाटकात आर्थिक गोष्टी इनकॅश करण्याकडे जास्त कल असल्यामुळे सर्वांना सामावून घेईल असा विषय असतो तर प्रायोगिक मध्ये मुळात पैसे किती मिळतील सर्वांना आवडेल का अशी वैचारिक बैठकच होत नसते आणि इथे नाटकाचा एखादा विषय अगदी बोलण्याजोगा नसेल आणि बोललो तरी तो कुठल्यातरी एका बाजूला झुकत असेल तरीही तो जशाचा तसा मांडला जातो आणि त्याबद्दल सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया झेलण्याची या प्रायोगिकवाल्या लोकांची अगदीच तयारी असते! या अर्थाने प्रायोगिक करणारे सातत्याने नव्या प्रायोगिकतेसाठी सतत सज्ज असलेले आणि ऊर्जेने भारलेले दिसतात.तसे व्यावसायिक बऱ्यापैकी हात राखून चवीचवीने वाढणारे वाढपी वाटत राहतात. तुम्हाला आवडावं म्हणूनच ते तशी डिश सजवतात, आग्रहाने जेवू घालतात आणि त्याचे चोख पैसेही घेतात.
आता समांतर म्हणजे तरी काय वेगळं आहे त्यात?
या कॅटेगरी करत असताना खूप सारी मिसळ झालेली आहे.सोशल विषयांवर बोलणं ते प्रॉब्लेम्स मांडणं यासाठी आता वास्तविक/ रियलास्टिक असं नाव ठरवलं गेलंय.
वेगवेगळ्या जातकुळीची नाटके त्यांचे आशय विषय त्यात काम करणारे सारे -हौशी, प्रायोगिक ते व्यावसायिक-हे सारे या नाटक खेळाचा एक भाग आहेत आणि या सगळ्यात केंद्रस्थानी आहे मनोरंजन जे नवरसांनी युक्त असं आहे आणि जशी दृष्टी तसं नाटक आणि त्या त्या कॅटेगरी मध्ये तुम्हाला ते दिसत राहणार!

हा सारा खेळ त्या सर्जकाचा आणि सृजनशक्तीचा आहे आणि त्याची मक्तेदारी कोणा एकाकडे नाही.आपण फक्त निमित्तमात्र साधने आहोत कला प्रसारासाठी,मनोरंजनासाठी,समाज प्रबोधनासाठी स्वतः मध्ये लपलेल्या अद्भुत शक्ती शोधण्यासाठी! मग ती फक्त मला आणि मलाच ठाऊक आहे असा अहंभाव ठेऊन कसं चालेल? किंवा इतर नाटक करणाऱ्याकडे दुर्लक्ष करून कसं जमेल? 'कुछ तो बात' आहे प्रत्येक नाट्य साधकाकडे त्याच्या कालाकृतीमध्ये मग ती शोधून त्याचा आस्वाद घेणं हेच तर उच्चकोटीची रसग्रहण आहे आणि त्या रसग्रहणाने मिळणारं समाधान खरंतर शब्दापल्याड आहे आणि ते एवढूश्या मुठीत किती मावणार?

© मकरंद घोडके

08/12/2022
राजर्षी शाहू करंडक निकाल
27/11/2022

राजर्षी शाहू करंडक निकाल

पुरुषोत्तम करंडक २०२२
29/08/2022

पुरुषोत्तम करंडक २०२२

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalakar katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share