09/08/2025
मी कधीही शॉर्टफिल्म करायचा विचार करतो तेव्हा विषय मला तगडा हवा असतो. तसा तो नसेल तर निदान त्यात नावीन्य तरी असावं. मी चॅलेंज सीकर आहे. चॅलेंज मिळणार असलाच काही विषय घ्यावा. जसं ते रेपिस्ट रेंजरमध्ये होतं, एक डेडबॉडीमध्ये होतं, थ्रीसममध्ये होतं. त्यामुळे डोक्यात बऱ्याच फुटकळ कल्पना असूनही मी त्यांच्यावर काही बनवणं नेहमीच टाळत राहिलोय. फुटकळ म्हणजे काय पटकन होऊ शकणाऱ्या आणि आखीवरेखीव परिणाम साधणाऱ्या कल्पना. उदाहरणार्थ, एक नवरा आपल्या बायकोला एक महिना किस करणं टाळतो आणि त्यातून उद्भवणारं कथानक. किंवा आपला पार्टनर आपला होऊ शकला नाही म्हणून त्याचा / तिचा काटा काढायचा प्लॅन करणारा सनकी प्रियकर आणि शेवटी येणारा ट्विस्ट. आणि वगैरे वगैरे. पण माझ्या लेखी यात काहीच चॅलेंज नसल्याने मी त्यावर कधीच काम केलं नाही. करायचं तर काहीतरी भरीव नाहीतर नाही.
ऑक्टोबर 2022. असंच पुढच्या शॉर्टफिल्मसाठी काय विषय घ्यावा विचार चालू होता. म्हटलं काहीतरी रिस्की करावं. जे आपल्या बजेटमध्येही बसेल आणि जे पुल ऑफ करण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयारही असू. का कोण जाणे पण डोक्यात फ्रँझ काफ्काची कथा अ हंगर आर्टिस्ट आली. कथेबद्दल थोडक्यात सांगतो. उपोषण ही कला म्हणून सादर करणाऱ्या एका कलाकाराची ही शोकांतिका. एखाद्या सॅडिस्टिक डिस्टोपियामध्ये घडत असावी अशी. कथेतून मला मिळालेला अर्थ म्हणजे एखाद्या कलाकाराने आयुष्यभर कितीही कलाकृती साकारल्या तरी मनासारखी कलाकृती कधी उतरलीच नाही असं त्याला सतत वाटत असतं. ती उतरवण्यासाठीची तडफड, अस्वस्थता या कथेत दर्शवली आहे. त्यासाठी रूपक म्हणून उपोषणाची कला वापरली आहे. लागलीच डोक्यात थ्रीसमनंतर पुढचा प्रोजेक्ट म्हणून अ हंगर आर्टिस्टच करायचा निर्णय झाला. साधारण कथानकही तयार झालं. दहा वर्षं पुढे भविष्यात घडणारी ही सूचक प्रेमकथा आकार घेऊ लागली. उपोषणाची कला, कलाकार झोपतो तो पिंजरा, त्याच्यावर नजर ठेवणारे दोन गार्ड एवढं कायम ठेवून बाकी सगळं बदललं. कलाकार, त्याचा एजंट, आणि त्यांच्यावर डॉक्युमेंट्री करणारी यूट्यूबर पोरगी या प्रमुख भूमिका कोण करू शकतात याचा विचार सुरू झाला.
आणि इथंच एक समस्या समोर उभी राहिली.
हंगर आर्टिस्टवर काम करायचं ठरल्यावर त्यावर यापूर्वी कुणी काही बनवून ठेवलंय का म्हणून यूट्यूबवर सर्च केलं. ढीगभर शॉर्टफिल्म्स मिळाल्या. ज्या पाहून माझा भ्रमनिरासच झाला. त्यातल्या मुख्य कलाकारांनी भूमिकेसाठी नाममात्रही वजन कमी केलेलं नव्हतं. ज्यामुळे व्हायला हवा तसा परिणाम त्या शॉर्टफिल्ममधून झाला नाही. आणि मला अर्थातच वास्तववादी पद्धतीने माझी शॉर्टफिल्म करायची होती. तब्बल चाळीस दिवस लो रिस्क डायटवर राहून, वजन कमी करून भूमिका साकार करण्यासाठी ज्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असाच ऍक्टर शोधायला हवा. आणि जरी तो मिळालाच तरी त्याच्या जीवावर एवढी मोठी जोखीम घेण्याची माझी खरंच तयारी असेल का ? वळलं तर सूत नाहीतर भूत अशीच ही सिच्यूएशन होती. तेव्हा मला यावर एकच पर्याय सापडला.
ही भूमिका आपणच करायची.
असं ठरवणंही मुळात कठीण होतं. मी काय ऍक्टर नाही. गरज पडल्यावर माझ्या शॉर्टफिल्म्समध्ये छोटे छोटे रोल्स केलेत. पण एवढी मोठी भूमिका आणि तीही उपोषण करत मी करू शकतो का ? पण निदान दुसऱ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा स्वतःवर प्रयोग केलेला बरा. शिवाय कथानकाचा धागा आपल्या खऱ्या आयुष्यातील घडामोडींशी जोडल्यास ऍक्ट करायला सोपंही पडेल. आणि मी तयारीला लागलो.
गेली तीन वर्षं या भूमिकेची मानसिक तयारी करण्यात, तिचा लुक ठरवण्यात गेलीत. निव्वळ अन्नाशिवाय किंवा लो कॅलरी डायटवर दिवसेंदिवस काढलेत. इच्छाशक्ती तीव्र करण्यासाठी बऱ्याच आवडत्या गोष्टींचा त्याग केला. चहा प्यायचं बंद करणं आणि त्यावर पंधरा महिने ठाम राहणं हे त्यापैकीच एक. बाहेर असताना काहीही खायची इच्छा होऊ नये म्हणून बाहेर जाताना पैसेच नेणं बंद करणं हे ही एक.
तर सांगायची गोष्ट अशी की मी माझी तयारी करत आणली आहे. आता इतर तयाऱ्या करायच्यात. एजंट आणि यूट्यूबवर पोरगी यांच्या भूमिकांसाठी कलाकार शोधायचेत. एजंट (पुरुष) साठी वयोगट आहे 25 ते 35. आणि यूट्यूबवर पोरीसाठी आहे 24 ते 28. इंटरेस्टेड असाल तर मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9370483179. इंटरेस्ट नसेल तर ही पोस्ट इतरांना शेअर करू शकता. अँड डोन्ट वरी. तुम्हाला मात्र भरपूर खायला मिळेल 🙂
फिल्मचं बजेट मी ठरवलेलं नाही. पण त्यासाठी आर्थिक किंवा इतर कुठल्या पद्धतीने मदत मिळाल्यास हवीच आहे. उदाहरणार्थ, लोकेशन, कॅमेरा इक्विपमेंट, साउंड इक्विपमेंट, पिंजरा, वाहनं वगैरे. बघा जमत असल्यास.
आणि तुम्ही विचार करत असाल की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय आणि हा वेडेपणा पुल ऑफ करणं अशक्य आहे तर बिलीव्ह मी. मी सध्या ज्या परिस्थितीत त्याहून हा वेडेपणा बराच आहे.
असो. वेळोवेळी तुम्हाला या प्रोजेक्टचे अपडेट देतच राहील. येतो.
(ज्यांना हंगर आर्टिस्ट हे प्रकरण माहित नाही त्यांच्यासाठी कमेंटमध्ये काफ्काच्या कथेची व्हिडिओ लिंक देतोय.)