24/05/2026
आरोह आर्ट्स आणि जयसत्य इव्हेंट्स या विलेपार्ल्यातील दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'रंग ढोलकीचे' हा एक अनोखा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार पद्धतीने काल दिनांक २३ मे, २०२६ रोजी विलेपार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. ओसंडून वाहाणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादाने तसेच निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या विलक्षण वादनाने हा कार्यक्रम तुफान रंगला. उपस्थित असलेल्या जवळपास ७००-७५० रसिकांना आरोह आर्ट्स आणि जयसत्य इव्हेंट्स यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम इतका भावला की अक्षरशः मध्यरात्री ठीक बारा वाजता पडदा पडेपर्यंत प्रेक्षक आपापल्या आसनांवर खिळून बसले होते. निलेश परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक फड अर्थात गण, गवळण, लावणी, कोळीगीते, जोगवा या सर्वांपासून ते आधुनिक फड म्हणजेच आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी अत्यंत नजाकतीने आणि वेगळेपणाने केलेला ढोलकीचा उपयोग इथपर्यंतच्या निवडक कलाकृतींचे सादरीकरण झाले. परंतु विशेष उल्लेखनीय म्हणावे म्हणजे या दोघांचे एकल सादरीकरण आणि मोजक्याच वेळासाठी केलेली अप्रतिम जुगलबंदी तसेच कृष्णा मुसळे यांनी त्यांचे वडील ज्येष्ठ ढोलकीपटू माननीय पांडुरंग घोटकर यांनी त्यांना शिकवलेले ढोलकीतील काही साध्या रोजच्या भाषेतील बोल ! कृष्णा मुसळे स्वतः अत्यंत तयार ढोलकीवादक तर आहेतच परंतु आपल्या पूर्वसुरींचे त्यांनी केलेले स्मरण आणि त्या सर्वांच्या योगदानाबद्दल त्या सर्वांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता खूप काही सांगून गेली.
महाराज गौरीनंदना पासून सुरुवात झालेली ही संस्मरणीय मैफल नटरंग चित्रपटातील 'आता वाजले की बारा' या गाण्याने संपली. निलेश आणि कृष्णा यांच्याबरोबरच कमलेश भडकमकर, सत्यजित प्रभु, अर्चिस लेले, दत्ता तावडे, वरद कठापूरकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांची साथ होती आणि पुष्कर श्रोत्री याच्या अत्यंत खुमासदार निवेदनाने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. ठरीव आणि साचेबद्ध संकल्पनांच्या मांदियाळीत 'रंग ढोलकीचे' हा अतिशय अप्रतिम संकल्पनात्मक कार्यक्रम विलेपार्ल्यात प्रथमच सादर करण्याचे भाग्य आरोह आर्ट्स आणि जयसत्य इव्हेंट्स ला लाभले ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
या सर्वांवर कडी म्हणजे केवळ निलेश तसेच कृष्णा यांच्या प्रेमाखातर ज्येष्ठ नेते सुनीलजी तटकरे आपला सर्व राजकीय तामझाम सोडून आपणहून आमच्याशी थेट संपर्क साधून केवळ एक रसिक म्हणून संपूर्ण कार्यक्रम उपस्थित राहिले.
आमचे सर्व मान्यवर प्रायोजक, सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि ज्यांनी आपल्या उपस्थितीने जवळपास संपूर्ण नाट्यगृह भारून टाकले त्या रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार ! आम्ही सर्वांचे कृतज्ञ आहोत !
-- आरोह आर्ट्स आणि जयसत्य इव्हेंट्स टीम