11/05/2022
शततारांचा महाराज
१९८३ किंवा ८४सालचा सवाई महोत्सव असेल. निवेदकांनी घोषणा केली आणि पुढच्या कलाकाराचं नांव सांगितलं, मला ते नांव नीटसं ऐकुच आलं नाही. पण ते कलाकार 'शततंत्री वीणा' वाजविणार आहेत एवढं कळलं. आता असल्या विचित्र नांवाचं वाद्य वाजविणारा कोणीतरी तामीळ, तेलगु भाषिक लुंगीवाला येणार, बरोबर घटम वाजविणारा घटमइतक्याच गोल अंगाचा साथीदार असणार अशी माझी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कुरलळे कुंतल असलेला, रुबाबदार, अतिशय देखणा असा पुरुषावतार रंगमंचावर अवतीर्ण झाला. त्याच्या हातातलं वाद्यदेखील वीणेपेक्षाही स्वरबहारशी साम्य दाखवणारं होतं. माझी उत्सुकता प्रचंड वाढली. कारण तोपर्यंत तंतुवादन मी प्रत्यक्ष ऐकलंच नव्हतं. माझे काका ज्यांना आम्ही भास्करबाबा म्हणायचो त्यांनी आवर्जुन मला अमजदअलींची एक कॅसेट दिली होती. (या अनुभवाविषयी स्वतंत्रपणे लिहिता येईल) तेवढंच ऐकणं गाठीला होतं. त्यामुळे आता नेमकं काय आणि कसं ऐकायला मिळणार याची हुरहुर होती.
सुरुवातीची तयारी झाली, तबला लावुन झाला. पण हे देखणे गृहस्थ शांतपणे तबलजींकडे बघत होते. स्वतःचं वाद्य त्यांनी मांडीवर घेतलेलं होत पण ते जुळवावं असं काही त्यांना वाटत नव्हतं.(याचं कारण मागाहुन कळलं) तबलजींनी म्हणजे बहुतेक उस्ताद शफात अहमद किंवा झाकिरभाई असावेत त्यांनी खुण केली आणि हातातल्या काडीनं(त्यांना कलाम म्हणतात) त्यांनी त्या तारांवर नाजुक-अतिनाजूक आघात केला आणि माझी तार लागली. तारांचा किणकिणाट इतका मधुर असु शकतो हे मला ठाऊकच नव्हतं. तंतुवाद्यातले सुरुवातीचे जोड, आलाप वगैरे वाजवुन त्यांनी बंदिश वाजवायला सुरुवात केली तोपर्यंत केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फॅन असलेला मी त्यांच्या वादनाचा गायकी भाषेत सांगायचं तर 'मुरीद' झालो होतो. हातातल्या कलामांनी असा हलका आघात करायचे कि अतिमुलायम स्वरलहरी संपुर्ण आसमंतात पसरायच्या. आलापी, जोड, झाला वगैरे इतकं रसपुर्ण आणि तितकंच सौंदर्यपुर्ण होतं ना कि हे वादन संपुच नय असं वाटु लागलं. उरात वेगवेगळ्या जखमा घेऊन फिरायचंच वय होतं माझं, त्यात हा नवा घाव झाला. त्याचं नांव 'पं शिवकुमार शर्मा'.
त्यांना संतूर किंवा शततंत्री वीणेचे जनक म्हणता येत नसेलही पण माझ्यासारख्या संगीत ऐकणार्या किंवा ऐकु ईच्छिणार्या करोडो नादलुब्धांना संतूर या कमालीच्या गोड वाद्याचा परिचय करुन देणारा साधक-वादक निश्चितच म्हणतां येईल.
काय वर्णन करायचं पंडितजींचं? वल्लभाचार्यांच्या मधुराष्टकात त्यांनी श्रीकृष्ण कसा दिसतो याचं वर्णन आहे,
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं ।
त्यांचं दिसणं मधुर, त्यांचं बोलणं मधुर, त्यांचे संगीतविषयक विचार मधुर, त्यांचं वाद्य मधुर, त्यांचं वाजवणं मधुर. सगळंकाही मधुर. हीणतेला मुळी जागाच नाही. तपश्चर्या तर येवढी कि डाव्या हातातल्या कलामाने संतूर नुसतं घासलं तरी इथं काळजात झणझण व्हावी.
मला गायन-वादनांतलं काहिच कळत नाही. राग ओळखता येत नाही. पण चांगलं गाणं किंवा चांगलं वाजवणं कुठलं याची माझी एक कसोटी आहे. पहिल्या तीस सेकदात किंवा फारतर मिनाटाभरात जे गाणं किंवा वाजवणं आपल्याला दुसरा कुठलाही विचार करु देत नाही ते चांगलं. इथंतर पहिल्याच झणत्कारात आपण शरणागत होतो. माझ्यासारख्या मठ्ठ श्रोत्याच्या बाबतीत हे घडविण्यासाठी गायक, वादक तपःपूतच असावा लागतो. येरागबाळ्याचं हे कामच नव्हे. यासाठी तपश्चर्या लागते, घोर पण डोळस साधना लागते, कान सदैव उघडे ठेऊन केलेली कानसेनगिरी असावी लागते,गुरुंकडुन मिळालेला पण नंतर स्वयंप्रज्ञेनं पुढे नेलेला विचार लागतो तेंव्हा कुठं माझ्यासारख्या करोडो अज्ञ श्रोत्यांच्या मनांत कायमचं घर करता येतं. तेसुद्धा जी वाद्यं पारंपारिकरित्या माहिती आहेत, वाजविली जातात त्यांच्या वादकांना. 'संतूर'च्या बाबतीत ठार अज्ञान. मलाच नव्हेतर भारतीय संगीतालाच हे वाद्य नवीन. शिवकुमारजींच्या आधी दूरवर काश्मीरातल्या दर्याखोर्यांतच गुंजणारं हे शंभर तारांच वाद्य. आपले गुरु,वडिल आणि तत्कालिन थोर सतूरवादक उमादत्त शर्मा यांनी आदेश दिला म्हणुन हिंदुस्थानी संगीतात 'संतुर' या वाद्याला स्थान मिळवुन द्यायचंच या निश्चयानं पंडितजींची यात्रा सुरु झाली. किती कष्ट ,किती अपमान, हालअपेष्टा भोगल्या असतील याची गणतीच नाही. पण अस्सल असतं ते झळाळतंच आणि टिकतं पण. या न्यायानं शिवकुमारची टिकलेच नाहीत तर झळाळतं रत्न होऊन चमकले. आज 'संतूर' म्हणजे पं. शिवकुमार हे जे समीकरण अपण अनुभवतो ते सगळं या साधनेतुन आलंय,तपश्चर्येतुन आलंय. आधुनिक ऋषीच हे. नव्या वाटा चोखाळतांना सर्वस्वाचा होम करायला डगमगले नाहीत आणि लोकाश्रय मिळाल्यावर हुरळले नाहीत. आधुनिक ऑलिंपिकचं बोधवाक्य अहे Citius-Altius-Fortius म्हणजे अधिक वेगात-अधिक उंचीवर-अधिक शक्तिने.
पं. शिवकुमार शर्मा यांच्याबाबतीत म्हणता येईल
अधिक उत्तम-अधिक मधुर-अधिक सौंदर्य
सूरसौदर्याचा महाराज आज अनंतात विलीन झाला. त्याला श्रद्धांजली द्यायची कशी? एकच करायचं, जे जे म्हणुन सुंदर आहे, सुरीलं आहे ते ते जपायचं आणि वाढवायचं.थोडं अवघड आहे. हे करतांना कधीतरी नकोनकोसं होईल तेंव्हा पंडितजींच्या अजरामर, अनवट सुरावटींमध्ये बुडुन जायचं. जगण्याची नवी उर्मी कशी येत ते अनुभवालच.
श्रीकुल
10/5/2022