20/05/2023
गाण्या पलीकडचे मन्ना डे
द्वारकानाथ संझगिरी
रफी किशोर लता आशा यांच्याप्रमाणे मन्ना डे चं पार्श्वगायनाचं राज्य प्रचंड कधीच नव्हतं. त्यांच एक छोट पण सुरेल राज्य होतं. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं हा त्या राज्याचा भक्कम पाया होता. आधी तलत, मग रफी नंतर किशोर हे त्या त्या काळात, पार्श्वगायनाचे हिरो होते. पण मन्ना डें नी त्यांच्याबरोबर कधीही स्पर्धा केली नाही. याचं कारण असं की त्यांचा आवाज हा एका विशिष्ट हिरोचा आवाज कधीच नव्हता ,किंबहुना तो हिरोचा आवाजही नव्हता. म्हणून ते सर्व हीरोंसाठी गायले. पण कधी? तर जेव्हा ती गाणी त्यांच्या राज्याच्या हद्दीतून जात तेव्हा. सुप्रसिद्ध अंध गायक के. सी डे यांचे ते पुतणे. मन्नाडेंच्या वडिलांना त्यांनी वकिली करावी असे वाटत होतं. झालं काय त्यांच्या काकांकडे सचिन देव बर्मन गाणं शिकायला येत. त्यांचं गाणं ऐकता ऐकता मन्ना डे ना गायक व्हावं असं वाटे. ते सचिनदांच्या गळ्याच्या इतक्या प्रेमात पडले की बर्मनदा नाकात गातात म्हणून ते नाकात गायला लागले. त्यावेळी त्यांच्या काकांनी त्यांना सांगितलं "कुणाची कॉपी करू नकोस स्वतःची शैली तयार कर".
मन्ना डे च्या वाडवडिलांचं घर कलकत्त्यात होतं. आपल्या शेजारी , कुलकर्णी ,गोखले चव्हाण धुरी शहा गंगवानी वगैरे रहात असतात. अगदी डिसूजा सुद्धा असतात . त्यांच्या शेजारी कोण राहत होत ठाऊक आहे ?
चक्क स्वामी विवेकानंद .त्यांचा जन्म झाला त्यावेळेला स्वामी विवेकानंद या जगात नव्हते.पण त्यांची आई त्यांना लहानपणी स्वामीजींच्या गोष्टी सांगत असे.
त्यांच्या घराच्या जवळ आणखीन एक महान व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीचे नाव रवींद्रनाथ टागोर. त्यांचं कर्तृत्व मन्नादानी आईच्या तोंडून लहानपणी ऐकले होते. तेव्हा स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. आजूबाजूला आभाळाएवढी माणसं होती. त्यामुळे मन्नादांवर चांगले संस्कार झाले .त्यांचे हिरो होते सुभाष चंद्र बोस. त्या काळात अनेक तरुणांना वाटत असे की स्वातंत्र्याचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो. बंगाली रक्त तर उसळणाऱ्या माणसाचंच रक्त. त्यामुळे मन्नादाना असे वाटे की काही काळ संगीत बाजूला ठेवूया आणि बंदूक घेऊन चार ब्रिटिश माणसांना ख्रिस्ताकडे पाठवूया. त्यामुळे असेल राष्ट्र प्रेमाचं गाणं त्यांच्या गळ्यातून नाही तर चक्क हृदयातून यायचं. एकदा वेस्टइंडीज मध्ये ते स्टेज शो करत होते आणि तिथे त्यांनी त्यांचं काबुलीवाला सिनेमातलं 'ऐ मेरे प्यारे वतन' हे गाणं म्हटलं. एका गोऱ्या बाईंने ते गाणं ऐकलं आणि कार्यक्रम संपल्यावर ती त्यांना भेटली आणि म्हणाली "तुम्ही जे गाणं म्हटलं त्याचे एक्झॅक्ट शब्द सांगाल का ,ते राष्टप्रेमाचं गाणं आहे का?" मन्नादा म्हणाले , " मी सांगतो पण तुला कसं कळलं ? तुला हिंदी येतं का? ती म्हणाली " नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही ते गायलं ते पाहून मला असं वाटलं की ते राष्ट्र प्रेमावर आधारित गाणं आहे." त्यांनी पहिल गाणं 1942 साली तमन्ना सिनेमात म्हटलं.त्यावर्षी मन्ना डे काकां बरोबर मुंबईत आले . त्यांचा सहाय्यक म्हणून. पगार 150 रुपये होता. त्यावेळी 150 खूप मोठी रक्कम होती. आणि आमच्या शिवाजी पार्कला ते रहात. त्या सिनेमातल्या एका गाण्यासाठी त्यांच्या काकांनी अनेक गायक ट्राय करून पाहिले.पण के. सि. डेंच समाधान होईना. त्यांनी मन्नादाना विचारलं, " तू गाणं म्हणतोस ? मन्ना डे एका पायावर तयार झाले. पहिल्यांदा जेव्हा ते गाणं गायले त्या वेळेला ते त्यांच्या काकांना पसंत पडलं नाही. काकांनी त्यांना ते कुठे चुकतात ते सांगितलं. दोन चार प्रयत्न केल्यावर ते पास झाले.
गाणं अर्थातच त्यांनी सुरैय्या बरोबर गायलं.ती सुद्धा तेंव्हा नवीन गायिका होती.1943 साली रामराज्य सिनेमात त्यांनी पाहिलं सोलो गाणं म्हटलं. त्या सिनेमाचे निर्माते असलेल्या विजय भटना वाल्मिकी साठी पार्श्वगायन करणारा गायक हवा होता. त्यांनी केसी डेना आधी विचारलं. ते म्हणाले ," मी ज्या सिनेमात काम करतो त्या सिनेमातल्या व्यक्तिरेखेसाठीच गातो, मी पार्श्वगायन करत नाही." त्यांना खर्जातल्या आवाजात गाणारा गायक हवा होता. केसी म्हणाले " माझा पुतण्या मन्ना हे गाणं गाईल" मन्नाकडे पाहून विजय भट्ट हतबुद्ध झाले. एवढा तरुण मुलगा आणि खर्जात कसा गाणार? पण केसी त्यांना म्हणाले की तू त्यालाच गाणं दे.आणि मन्नादानी ते गाणं थेट काकांच्या शैलीत गायलं. तिथून पुढे त्यांनी प्रचंड मोठा प्रवास हिंदी सिनेमात केला.
मन्नादा जर गायक झाले नसते, तर ते उच्च दर्जाचे खेळाडू होऊ शकले असते. ते क्रिकेटपटू होऊ शकले असते, पण त्यांचं गाण्यावर एवढं प्रेम होतं की फलंदाजी करताना आणि शतकाकडे जाताना ते चक्क गाण्याचा रियाज करत . कदाचित देशाने त्याकाळतला सौरभ गांगुली गमावला असावा. ते फुटबॉल खेळत पण ड्रिबल करत असतानाही त्यांच्या जिभेवर रागाची उजळणी होत असे. बंगाली माणसाच्या रक्तात फुटबॉल प्रेम असतं. मन्नादा मोहन बगानचे. तर बर्मन दादा ईस्ट बंगालचे. केवळ फुटबॉल वरून दोघांची खूप भांडणं होत.
मन्नादा मल्ल होते . त्यांच्या शरीराकडे पाहिलं की ते कळतं. त्यांनी ऑल बंगाल कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला होता ते अंतिम सामन्यात सुद्धा पोचले. पण त्या सामन्याला जाताना त्यांची बस ड्रायव्हरबरोबर मारामारी झाली त्यामुळे त्या सामन्याला ते उशिरा पोहोचले आणि सामना चुकला. पण त्यानंतर त्यांनी जी बस पकडली त्या बसने त्याना थेट संगीत या स्थानावर उतरवलं.
काकांनी आपल्या पुतण्याचे फाजील लाड मात्र कधी केले नाहीत. एकदा काकांनी मन्नादाना सांगितलं, "मी एक ट्यून तयार केली आहे. त्याचं नोटेशन स्टडी कर आणि उद्या महम्मद रफी आला की त्याच्याकडून गाण्याचा सराव करून घे. रफी ते गाणं गाणार आहे " मन्नादा आपल्या काकांना म्हणाले, " मी का नको गाऊ? काका म्हणाले , " मुळीच गाऊ नकोस तुझा आवाज रफी सारखा नाही त्यालाच हे गाणं योग्य होईल. " मन्नादा मनातल्या मनात चरफडले. त्यांनी रफीला गाणं शिकवलं. जेव्हा ते गाणं रफीच्या आवाजात रेकॉर्ड झालं त्यावेळी त्यांना कळलं की रफीच ह्या गाण्यासाठी योग्य आहे, असं काकांनी का सांगितलं. पण तोच रफी सांगायचा की माझी गाणी तुम्ही सर्वजण ऐकता, पण मी मात्र मन्नाची गाणी ऐकतो. दोघांची मैत्री शेवटपर्यंत टिकली. महम्मद रफी आणि मन्ना डे यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा नक्कीच होती पण स्टुडिओच्या पलीकडे गाढ मैत्री होती.दोघेही खारला जवळ रहायचे .दोघेही एकत्र पतंग उडवायचे .लहानपणी मन्नादांचा आवडता छंद म्हणजे पतंग उडवणे.त्यात मन्ना डे दादा होते. दोघांच्या पतंगाच्या स्पर्धेत रफी कधीही जिंकला नाही. मन्ना डे नेहमीच रफीचा पतंग कापायचे.
त्यांचा मांजा लखनऊ किंवा अहमदाबाद वरून यायचा. त्याला स्पेशल स्टार्च लावलेला असायचा. पतंग सुद्धा ते ऑस्ट्रेलियाहून मागवायचे किंवा ऑस्ट्रेलियातून मागवलेल्या पेपरमधून तयार करायचे. एवढा मोठा गायक झाल्यानंतर सुद्धा संगीता खालोखाल त्यांचे प्रेम होतं पतंग उडवणे आणि महम्मद रफी चे पतंग कापणे.
दोघांची मैत्री मन्ना डें च्या जंजीर मधल्या गाण्यासारखी वाटते.यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी मन्ना डे बद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल आणि त्यांचे इतर किस्से पुढच्या स्तंभात.