26/09/2024
अस्वस्थ तरुणाईचा आश्वासक आवाज - शरद पवार..!!
दोन दिवसांपुर्वी MPSC ने राज्यसेवा पुर्वपरीक्षेचे नवे परीपत्रक जारी केले. ज्यामध्ये दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेण्याचे नियोजीत असून त्यामध्ये कृषि विभागाच्या २०२४ साठी मंजूर असलेल्या २५८ जागांचाही समावेश करण्यात येणार आहे. वास्तवीक पाहता कृषि विभागाच्या जागांची मंजूरी प्रक्रीया योग्य वेळेत झाली असती तर ही परीक्षा तीन महिने लांबली नसती म्हणजेच २५ आॅगस्टलाच परीक्षा झाली असती. परंतू सरकार आणि प्रशासकीय पातळीवरून यात दिरंगाई झाली. कृषि विभागात २०२४ साठी २५८ जागांची भरती ही आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती आहे. या जाहीरातीनुसार जवळपास ४८ वर्ग - १ दर्जाचे अधिकारी मिळणार आहेत. त्यामुळे या जागांची वेळेत पुर्तता MPSC कडे होणे गरजेचे होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे प्रतिनीधी भागवत जोकारे, गणेश गोंडाळ आणि त्यांची संपुर्ण टीम यासाठी रात्रंदिवस मंत्रालयात धावपळ करत होते. आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनीधींकडे पाठपुरवठा करत होते. परंतू तरीही २५ आॅगस्टच्या परीक्षेत जागा समाविष्ट होत नसल्याने विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये तीन दिवसांचे आंदोलन रस्त्यावर बसून केले. त्याला खा. सुप्रियाताई सुळे, आ. रोहीतदादा पवार यांसह विवीध पक्ष, संघटनांनी जाहीर पाठींबा दिला. आ. रोहीतदादा पवार स्वतः आंदोलनस्थळी पुर्णवेळ विद्यार्थ्यांसोबत होते. शेवटी विद्यार्थ्यांच्या आक्रमक भुमिकेमुळे अवघ्या दोन दिवस आधी MPSC ला २५ आॅगस्टची परीक्षा स्थगीत करावी लागली. आधीच दोनवेळा पुढे ढकललेली परीक्षा पुन्हा लांबली होती तरीही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला कारण कृषिच्या वाढीव जागांच्या निमीत्ताने लांबलेल्या परीक्षेमुळे २५ आॅगस्टलाच होणार्या IBPS परीक्षेचा मार्ग सर्वांसाठी मोकळा झाला होता. केंद्र सरकारची IBPS परीक्षा २५ आॅगस्टला होणार होती आणि MPSC पुर्वपरीक्षासुद्धा २५ आॅगस्टलाच नियोजीत केली होती त्यामुळे दोन्हीकडे फाॅर्म भरलेले हजारो विद्यार्थी कोणत्यातरी एका परीक्षेला मुकणार होते. हजारो रुपयांचे परीक्षा शुल्क भरून, कित्येक वर्ष तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे कृषिच्या वाढीव जागांसाठी आग्रही असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वानुमते पाठींबा देण्यात येत होता. २५ आॅगस्टची MPSC ची परीक्षा लांबल्यामुळे मुलांना IBPS ची परीक्षा देता आली आणि आता १ डिसेंबरला ते MPSC ची परीक्षाही अधिक तयारीने देऊ शकतात. परंतू हे सहजासहजी शक्य झाले नाही. अगदी दोन दिवस आधी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांना अक्षरशः रडकूंडी आणले होते. अगदी जुलै महिना संपेपर्यंत कृषिच्या जागा जाहीरातीत वाढवण्याचे आश्वासन देण्यात येत होते परंतू वाढिव जागांसह परीक्षा घेण्याचे गांभीर्य दिसून येत नव्हते. अगदी परीक्षेची प्रवेशपत्रके तयार झाली तरीही जागा समाविष्ट झाल्या नाहीत आणि मुलांची अस्वस्थता वाढत गेली. सरकार दरबारी रात्रंदिवस पळणारे विद्यार्थी अक्षरशः हतबल झाले होते. एक-एक दिवस निराशा देत होता. शेवटी 'अस्वस्थ तरुणाईचा आश्वासक चेहरा' मैदानामध्ये उतरला आणि सर्वमान्य निर्णायक तोडगा निघाला. जेव्हा संघर्षाचा अंधार गडद होत जातो तेव्हा फक्त एका नावाचा आधार असतो "शरद पवार."
दि. ०७ आॅगस्ट २०२४ रोजी राहुरी येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या परमेश्वर थोरात या सहकार्याचा मला फोन आला. २५ आॅगस्टच्या परीक्षेत कृषि विभागाच्या जागा समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांना सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने आदरणीय पवारसाहेबांपर्यंत विषय पोहचवणे गरजेचे असल्याचे सांगीतले. साहेब त्यावेळी दिल्लीला अधिवेशनात होते पुण्याला यायला तीन दिवसांचा वेळ होता. पण मुलांकडे वेळ कमी होता त्यामुळे दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे काही प्रतिनीधी साहेबांकडे पाठवण्याचे ठरले. साहेबांचे दिल्लीमधील कार्यालयीन अधिकारी, स्वीय सहाय्यक श्री. सिद्धेश्वर शिंपी सरांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तातडीने मुलांना भेटण्यासाठी वेळ देऊ केली. दि. ०९ आॅगस्ट २०२४ रोजी दिल्ली येथे कृषीपदवीधर विद्यार्थ्यांचे प्रतिनीधी आदरणीय पवारसाहेबांना भेटले. २५८ जागांच्या जाहीरातीला सरकारने चालढकल केली असून आता अवघे १५ दिवस हातात असल्याचे सांगीतले. साहेबांनी दुसर्याच दिवशी म्हणजे १० आॅगस्टला पुण्यामध्ये काही प्रतिनीधींना संपुर्ण कागदपत्रांसह भेटण्यास सांगीतले. ठरल्याप्रमाणे १० आॅगस्ट २०२४ रोजी साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री. सुनिल रानडे सरांच्या माध्यमातून पुण्यातील शिष्टमंडळाने साहेबांची भेट घेतली. साहेबांनी पुण्यामध्ये जवळपास आर्धा तास मुलांबरोबर संवाद साधला, विषय समजून घेतला. लगेचच कृषी विभागाच्या सचिव राधा विहंग मॅडम यांना फोनवरून या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन जागा तातडीने एमपीएससीकडे वर्ग करण्यासाठी कार्यवाही करावी असे सुचित केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये रानडे सरांनी सातत्याने मुलांबरोबर संपर्क राखून आवश्यक माहिती मागवून घेतली. त्यानंतर सोलापुर दौरा आटपून मुंबईमध्ये पोहचल्यानंतर साहेबांनी दि. १३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले तसेच स्वतः फोनवरून मुख्यमंत्र्यांबरोबर बोलले. आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा मसुदा साहेबांचे खाजगी सचिव श्री. सतिश राऊत सरांनी तयार केला. राऊतसर स्वतः कृषि पदवीधर आहेत आणि उपजिल्हाधीकारी पदावर काम करतात त्यामुळे संपुर्ण विषयाची मुद्देसुद मांडणी पत्रामध्ये करण्यात आली. आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोनवरून संवाद साधल्यामुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला. कृषी विभागाच्या मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जागा मंजुरीची फाईल सही करून सामान्य प्रशासन विभागाकडे वर्ग केली. आणि योगायोगाने त्याच दिवशी त्यांची बदलीही करण्यात आली. १४ आॅगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून फाईल एमपीएससीकडे वर्ग होणे गरजेचे होते परंतू तिथून तातडीने कार्यवाही झाली नाही आणि १५ आॅगस्टच्या शासकीय सुट्टीने एक दिवस वाया गेला. १६ आॅगस्टच्या संध्याकाळी सामान्य प्रशासन विभागाकडून ईमेलद्वारे एमपीएससीला पदमंजूरी कळविण्यात आली. शनिवार १७ - रविवार १८ सलग शासकीय सुट्टीमुळे हार्डकाॅपी १९ आॅगस्ट २०२४ रोजी आयोगाला प्राप्त झाली. भागवत जोकारे, प्रमोद पाटील, शुभम जाधव, श्रेया नागरे, प्रियंका जगताप, पूजा शिंदे, प्रसाद शिंदे, परमेश्वर थोरात, रमाकांत टेकाळे यांसह विभागवार प्रतिनीधी आयोग, मंत्रालय, मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरवठा करत होते. हे विद्यार्थी स्वतःचा अभ्यास सोडून अक्षरशः रात्रंदिवस मंत्रालयात पळत होते. साहेबांच्या आॅफीसकडे माहिती पोहचवत होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनींना भेटून त्यांची पत्रे, ट्विट, बातम्या करुन घेत होते.
आयोगाकडे पदमंजुरीची फाईल पोहचल्यानंतर जाहीरात काढून प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी अगदीच कमी वेळ होता. त्यामुळे फक्त पाच दिवसांत ही प्रक्रीया करता येणार नाही हे स्पष्ट होते त्यामुळे परीक्षाच रद्द करून काही कालावधीनतर सुधारीत जाहीरातीने परीक्षा घेतली जावी हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आयोगाने २५ तारखेच्या परीक्षेची प्रवेशपत्रके काढली होती. आता या २५८ जागा समाविष्ट करायच्या असतील तर नियोजीत परीक्षा पुढे ढकलावी लागेल. जे यापुर्वी आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे तीनवेळा झालेले होते त्यामुळे आयोग आणि सरकार ही नाराजी पुन्हा ओढावू ईच्छित नव्हते. १९ तारखेला पुण्यामध्ये कृषीच्या मुलांना याविषयावर पत्रकार परीषद घ्यायची होती त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर पत्रकार भवन परीसरात एकत्र झाले. परंतू पोलीसांनी लगेचच मध्यस्ती करून प्रशासकीय पातळीवरून कृषीमंत्र्यांबरोबर बोलणे करून दिले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सध्यस्थितीबद्दल ट्विटरवरून माहिती प्रसारीत केली. मुलांच्या विनंतीवरून त्याच रात्री ऊशीरा प्रशासनाद्वारे शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुणे विमानतळावर भेट करुन देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी २० तारखेला दुपारपर्यंत या विषयावर परीपत्रक जारी करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र २० तारखेला सरकारद्वारे उचित कार्यवाही झाली नाही त्यामुळे सरकारवारूद्ध संघर्षाची वेळ मुलांवर आली. कारण गेले चार महिणे ही मुले अभ्यास सोडून आमदार, खासदार, मंत्री, मंत्रालय, आयोगाकडे चकरा मारत होती, पाठपुरवठा करत होती. जुलै महिण्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान आ. अभिमन्यु पवारांनी येत्या परीक्षेत कृषीच्या २५८ जागांचा समावेश तातडीने करून घ्यावा अशी विनंती केली होती, त्याला कृषीमंत्र्यांनी लेखी उत्तरात त्यासंदर्भात वित्त विभागाची मंजुरी मिळाली असून सकारात्मकता दर्शवली होती. परंतू एक महीना ही फाईल कृषी विभागाच्या टेबलवरून पुढे का सरकली नाही याबद्दल अनभिज्ञता आहे. १३ आॅगस्ट रोजी आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तसेच फोनवरून चर्चा केल्यानंतर फाईल कृषीमंत्रालय, सामान्य प्रशासन विभाग ते एमपीएससी आयोगापर्यंत पोहचली.
परंतू सरकार आणि आयोग परीक्षा पुढे ढकलण्यासाठी तयार नव्हते. शेवटी २० आॅगस्टच्या रात्री हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पुण्यामधील लाल बहादुर शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला उतरले. बघता बघता राज्यभरातून त्यांना पाठींबा मिळू लागला. दुसर्याच दिवशी सकाळी खा. सुप्रियाताई सुळेंनी आंदोलनाला भेट दिली आणि महाविकास आघाडी विद्यार्थ्यांसोबत असल्याचे आश्वस्त केले. २१ तारखेला संध्याकाळी आ. रोहीतदादा पवार स्वतः आंदोलनात सहभागी झाले. रात्रभर विद्यार्थ्यांसोबत बसून राहीले. सरकारने आंदोलनातला एक गट बाजूला करून त्यांनाच विद्यार्थ्यांच्या विरोधात बोलायला सांगून विषय भरकटवण्याचा, फोडाफोडी करण्याचाही प्रयत्न केला. खरेतर २१ तारखेला रातोरात पोलीसबळाचा वापर करून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळावरून हटवण्याचा सरकारचा विचार होता परंतू रोहीतदादा तिथे बसून असल्यामुळे विद्यार्थ्यांना ताकद मिळाली. आता परीक्षेला अवघे काही तास शिल्लक होते. अजूनही कोणताच स्पष्ट निर्णय सरकारने घेतला नव्हता. शेवटी पवारसाहेबांनी निर्णायक डाव टाकला. रात्री ११:५० वाजता साहेबांनी ट्विटरवरून सरकारला इशारा दिला. "जर विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला नाही तर उद्या (ता.२२ आॅगस्टला) मी स्वतः पुण्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होईल." साहेबांच्या थेट भुमिकेमुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना दहा हत्तींचे बळ मिळाले. रातोरात आंदोलनस्थळावर गर्दी वाढू लागली. साहेबांच्या ट्विट नंतर सगळा माहोलच बदलून गेला. हेकेखोरपणे विद्यार्थ्यांना रडकूंडीला आणलेल्या सरकारला साहेबांच्या आक्रमक पावित्र्यामुळे नमते घ्यावे लागले आणि MPSC ने २२ तारखेला नियोजीत परीक्षा रद्द करत असल्याचे परीपत्रक जारी केले. मुलांनी अफाट उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले. आयोगाची परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो मुलांना IBPS ची परीक्षा देता आली आणि परीक्षाशुल्कापोटी भरलेले हजारो रुपयेसुद्धा कामी आले. एवढ्यावर थांबतील ते पवारसाहेब कसले? साहेबांनी पुण्यात येताच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. पुढची रणनिती आखली. मी स्वतः मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आपण कृषिच्या २५८ जागांसह सुधारीत जाहीरातीद्वारे लवकरात लवकर परीक्षा घेण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगीतले. त्यानुसार साहेबांच्या कार्यालयाद्वारे बैठकीसाठी वेळ मागण्यात येत होती परंतू प्रचाराच्या कामात पुर्णवेळ रममान सरकारला विद्यार्थ्यांसाठी वेळ सापडत नव्हती. शेवटी १६ सप्टेंबरला आदरणीय साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने बैठकीसाठी प्रयत्नशील असल्याचे परंतू सरकारपातळीवरून दुर्लक्ष होत असल्यासंदर्भात थेट नाराजीपत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत केले. त्याचे परीणामस्वरुप दुसर्याच दिवशी आयोगाने २३ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन कृषिच्या २५८ जागांसह नव्याने परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचे परीपत्रक काढले. आणि शेवटी मोठ्या प्रतिक्षेनंतर, मोठ्या संघर्षानंतर आज MPSC ने अधिकृतरित्या कृषि विभागातली गेल्या पाच वर्षांमधली सर्वात मोठी भरती जाहीर केली असून आज त्याची जाहीरातही प्रसारीत करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबरला ही परीक्षा होत असून राज्यातील लाखो गोरगरीब, कष्टकरी, शेतकर्यांच्या मुलांसाठी ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
मी या संपुर्ण प्रक्रीयेमधला एक छोटासा भाग होतो. यादरम्यान मी बर्याच विद्यार्थ्यांबरोबर संपर्कात होतो. परंतू सोलापूरच्या एका भगिनीच्या फोनने मला प्रचंड अस्वस्थ केले. खेडेगावात घरून अभ्यास करणार्या तीघी-चौघींनी एकत्र बसून मला फोन केला होता. कृषिच्या २५८ जागा वाढण्यासाठी आणि IBPS ची परीक्षा बुडू नये म्हणून आयोगाची नियोजीत परीक्षा पुढे ढकलावी यासाठी त्या अस्वस्थ होत्या. त्यांच्यापैकी एका मुलीच्या वडीलांनी कर्जामुळे आदल्या दिवशीच विष पिण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने त्यांचा जीव वाचला. त्यांचे हुंदके मनाला विचलीत करणारे होते. मी त्यांना फक्त आधार देत होतो. साहेबांच्या नावाने आश्वस्त करत होतो. फक्त साहेबच यातून मार्ग काढू शकतात असा विश्वास त्या व्यक्त करत होत्या. साहेबांनी अगदी शेवटच्या क्षणाला निर्णायक साथ दिली आणि हा लढा यशस्वी झाला. उद्याच्या परीक्षेमधून अधिकारी पदावर बसणारे विद्यार्थी या सरकारने त्यांना तीन दिवस रस्त्यावर बसण्याची वेळ आणली होती हे कधीही विसरू शकणार नाहीत. आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, रोहीतदादा यांनी शेवटपर्यंत हा विषय मार्गी लावला. साहेबांचे सर्वच कर्तव्यदक्ष कार्यालयीन सहकारी ज्यामध्ये सिद्धेश्वर शिंपीसर, सुनिल रानडेसर, सतिश राऊतसर यांनी जातीने या विषयात लक्ष घातले. व्यस्त कामकाजामधून काळजीपुर्वक या विषयाचा पाठपुरवठा केला. यांसह सुप्रियाताईंचे सहकारी मयुरदादा जगताप यांनी ताईंना आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी, रोहीतदादांचे सहकारी प्रमोद पाटील यांनी रोहीतदादांचा पुर्णवेळ सहभाग मिळवून देण्यासाठी संपुर्ण प्रक्रीयेदरम्यान मोलाची साथ दिली, विद्यार्थी हिताची काळजी घेतली याबद्दल सर्वांचेच मनःपुर्वक आभार. आदरणीय पवारसाहेब अडचणीच्या काळामध्ये खुप मोठा आधार म्हणून पाठीशी ऊभे राहतात. हातामध्ये घेतलेले काम तडीस नेतात. हा आधाराचा हात सोबत असल्यामुळे संकटांची भिती कधीही वाटत नाही. साहेबांच्या आधारवडाच्या संग्रहामधली ही एक छोटी कथा आज पुर्णत्वास गेली आहे..!!
- निखीलआण्णा घाडगे, ९३७३८१५५९५
Sharad Pawar Supriya Sule Rohit Rajendra Pawar