31/10/2025
एक अविस्मरणीय अनुभव, ताजमहल हॉटेल या ऐतिहासिक वास्तूचा.......
सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथील ताजमहाल हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कलेचे सादरीकरण करण्याचा योग आला. एक शतकाहूनही अधिक काळ समुद्रकिनारी उभी असलेली ती वास्तू! स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत अखंड इतिहासाची तसेच टप्प्याटप्प्याने बदललेल्या मुंबईची साक्षीदार असलेली ती वास्तू! 26 /11 सारख्या भयानक हल्ल्याला सामोरे जाऊनही अगदी डौलात उभी असलेली ती वास्तू! त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तिथली भव्यता डोळे दिपून टाकणारी होती. तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मग तेथील कार पार्किंग करणाऱ्या व्यक्ती पासून ते सिक्युरिटी, डोअर किपर, रिसेप्शन, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या लोकांपासून ते मॅनेजर पर्यंत सर्वांचा पाहुणचार आणि आदर हा मनात घर करणार होता. एकूणच तिथल्या सर्व लोकांचा शिष्टाचार एक नातं जोडणारा होता. तिथले सर्व वातावरण मन प्रसन्न करणारं होतं.
आम्हाला तिथे कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची शान असलेली लावणी सादर करायची असल्यामुळे आमच्या मुलींनी केलेला पेहराव आणि साज शृंगार हा तेथील विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारा होता. बहुधा त्यांना पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसापर्यंत चापून चोपून नेसलेली नऊवारी पाहून त्यातूनही या भारतीय मुलींच सौंदर्य इतकं खुलून कसं दिसतय? याचं कुतूहल असावं. कारण भेटणारा प्रत्येक विदेशी व्यक्ती आमच्या मुलींचे तोंड भरून कौतुकच करत होता. आणि कलाकार म्हणून यापेक्षा वेगळं काही अपेक्षितही नसतं. आणि त्यातल्या त्यात आम्हा कोल्हापूरच्या कलाकारांना विशेषतः केडीसी अकॅडमीच्या कलाकारांना ताजमहल सारख्या हॉटेलमध्ये लावणी सादर करण्याची संधी मिळाली हा सन्मान जनक योगच म्हणावं लागेल.
खूप खूप धन्यवाद गौरीश सर 🙏🙏🙏
लावण्यवती कलाकार:- श्रद्धा शुक्ल (नृत्य दिग्दर्शक), साक्षी गायकवाड, सुयेशा कांबळे
मार्गदर्शक:- अविनाश गायकवाड व केडीसी टीम.