17/01/2024
विभाजनपूर्व चंद्रपूरचे (आजच्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचे) इतिहासकार - अण्णाजी जयराम अर्थात अ. ज. राजूरकर (१९२४-१९९२)
चंद्रपूरला स्वत:चा असा वैभवशाली इतिहास आहे हे जगाला दाखवून देणारे अग्रगण्य इतिहासकार म्हणून अ. ज. राजूरकर यांचे नाव घ्यावेच लागेल. १९५६ साली प्रकाशित झालेला त्यांचा 'चंद्रपूरचा इतिहास' हा ग्रंथ चंद्रपूरच्या इतिहासावरील प्रमुख संदर्भग्रंथ आहे. त्याचे प्रकाशन लोकनायक माधव श्रीहरी उपाख्य बापुजी अणे यांच्या हस्ते तर लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थित झाले. त्या ग्रंथास विदर्भाच्या इतिहासाचे पितामह डॉ. यशवंत खुशाल देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी राजूरकरांनी जवळपास १० वर्षे अहर्निश परिश्रम केले. अनेक पोथ्या, हस्तलिखिते, शिलालेख, प्राचीन दस्तऐवज यांचे अध्ययन करून राजूरकरांनी हा ग्रंथ निर्माण केला. त्यासाठी शेकडो गावांना भेटी दिल्या, रानवाटा धुंडाळल्या, किल्ले, मंदिरे, लेणी, गुंफा यांची भ्रमंती केली. डॉ. य. खु. देशपांडे, डॉ. शं. गो. चट्टे, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, सेतू माधवराव पगडी, भाऊजी काकडे इ. ज्येष्ठ प्रभूतींची चर्चाविनिमय करुन गोष्टींची उकल केली व काही मौलिक निष्कर्ष मांडले.
या ऋषित्युल्य इतिहास संशोधकाची जन्मशताब्दी येत्या २७ जानेवारी २०२४ रोजी येत आहे. त्याचे औचित्त्य साधून इतिहासकार अ. ज. राजूरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात त्यांचा जन्मशताब्दीसोहळयाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या प्रसंगी त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित गौरवग्रंथाचे प्रकाशन सुद्धा केले जाणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. चंद्रशेखर गुप्त, डॉ. र. रा. बोरकर या ज्येष्ठ इतिहास संशोधकांची विशेष उपस्थिती राहणार असून ते उपस्थित इतिहास अभ्यासकांना ते मार्गदर्शन करतील. या सोहळ्याच्या प्रसंगी 'गोंडवन इतिहास संशोधन मंडळा'ची स्थापना केली जाणार आहे. चंद्रपूर-गडचिरोलीच्या पर्यायाने गोंडवनाच्या इतिहास संशोधनास चालना देणे व येथील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करणे यांसाठी गोंडवन इतिहास संशोधन मंडळ कटिबद्ध असेल.