12/02/2026
#अमृताप्रितम
*मृत्युपत्र : अमृता प्रितम*
अनुवाद:
डॉ ज्ञानेश्वर थोरात
-----------------------------
अत्यंत संवेदनेने आणि उत्कटतेने लिहिते आहे ...मी माझं मृत्युपत्र!
माझ्या मृत्यूनंतर स्वच्छ करावी माझी निवासी रुम!
शोधून काढावी घरभर विखुरलेली प्रत्येक वस्तू आणि कुलपाशिवाय इतस्ततः विखुरलेले माझे सामानसुमान!
देऊन टाका...
माझी स्वप्न आणि ध्येयवाद....
त्या समस्त स्त्रियांना... ज्यांनी किचनपासून बेडरूमपर्यंत स्वतःला संकुचित करून आत्मविश्वास हरवून बसल्या आहेत स्वतःचा!
आणि विसरून गेल्या आहेत ! कित्येक वर्षांपासून एखादे विशाल स्वप्न पाहणं!
वाटून टाका. .. माझे खळखळून हस्य... वृद्धाश्रमातील त्या वृद्धांना, ज्यांची मुलं अमेरिकेच्या झगमगीत शहरांत ...
हरवून बसली आहेत स्वतःला!
शोधा....
माझ्या टेबलावर.... काही रंग विखुरलेले असतील , या रंगांनी रंगवा त्या विधवेची साडी... तिचा माणूस रक्ताने रंगला आहे!... देशाच्या सीमेवर!
आणि काल संध्याकाळपासून तिरंग्यात लपेटून पडला आहे गाढ चिरनिद्रेत!
वाटून टाका !
माझे अश्रू, समस्त शाहिरांना... माझा इरादा आहे त्याच्या प्रत्येक थेंबातून होईल पैदा एक गज़ल!
माझे मानसन्मान ,इज्जत अब्रू..........
देवून टाका त्या वेश्येला,
ती वाटत आहे प्रेम स्वतःच्या मुलीला शिकवण्यासाठी!
या देशातील एक एका युवकांना पकडून जरूर ठोका एक इंजेक्शन...
माझ्या आक्रोशाचे !
पडेल त्याची गरज क्रांतीच्या दिवसात त्यांना!
माझा हिस्स्याचा वेडेपणा...
तो देऊन टाका त्या सुफी साधकाला,
तो सर्वस्वाचा त्याग करून निघाला आहे, ईश्वराच्या शोधात!
बस...
बाकी उर्वरित
माझी ईर्ष्या ,
माझी लालंच,
माझा क्रोध,
माझे खोटारडपणं,
माझा स्वार्थ,
त्यांचे असे करा, त्यांना जळू द्या माझ्या चितेवरच!