05/06/2024
प्रिय पालक, प्रेक्षक आणि मित्र मंडळींनो.
नुकताच आपल्या उन्हाळी नाट्य शिबीर २०२४ चा सांगता समारंभ सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे येथे पार पडला. तळ्यातल्या माशांच्या गमती जमती मधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी "तळाच्या काठावर" आणि विंदा करंदीकर यांच्या भीतीदायक पण गमतीदार कवितांमधून उलगडत जाणारी "पिशी मावशी" अशा दोन एकांकिका तब्बल ३४ बाल कलाकारांनी सादर केल्या. आमच्या विनंतीला मान देऊन लाडका आलोक दादा ( आलोक राजवाडे ) कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. त्याचे मनापासून आभार. अगदी प्रेमाने आलोक दादाने दोन्ही एकांकिका पाहिल्या आणि सगळ्या छोट्या कलाकारांचं भरभरून कौतुकही केलं.
नाटक सुरु होण्या आधीची तयारीची पळापळ, मेकअप करताना कोणाची रडारड तर कोणाची उत्सुकता, set, set property, costume property, गरजेच्या ईतर वस्तू योग्य जागी ठेवण्याची घाई, हे चालु असतानाच संवाद म्हणत राहून ते आठवणं, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह, "लाडक्या आलोक दादा समोर छानच सादर करायचय बरका" हे सारखं स्वतःला बाजावणं, कुठून entry घ्यायची? कुठे exit आहे? Backstage कुठे आहे? माझे कपडे कुठे ठेऊ? Lightline नेमकी कुठे आहे? Stage चा centre कुठे आहे? असे एक ना अनेक प्रश्न, तिसरी घंटा झाल्यावर पोटात आलेला गोळा, नाटक सुरू झाल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मिळालेले बळ, योग्य जागी योग्य संवाद घेतल्याचं समाधान, कोणी संवाद विसरलं तर त्याला हळूच संवाद आठवून द्यायची घाई, विंगेत वस्तू सापडत नाहिये म्हणून उडालेला गोंधळ, पण तरीही रंगमंचावर येऊन अचूक पकडलेलं पात्र, आई बाबा, आजी आजोबा किंवा ओळखीचं कोणी प्रेक्षागृहात दिसतंय म्हणून चालू नाटकातूनच त्यांना दाखवलेली ओळख, गाण्याच्या तालावर धरलेला ठेका, मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद, नाटक उत्तमरित्या सादर केल्यावर जग जिंकल्याचा आनंद असे आयुष्यभर सोबत राहणारे एक ना अनेक अनुभव घेऊन मुलं घरी निघाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून एकच ओळ आठवली "याच साठी केला अट्टाहास".
हे सगळं छान आणि योग्य रित्या पार पाडण्यासाठी असंख्य हात झटत असतात. मयुरी माकुडे, केदार कुलकर्णी, अक्षय चव्हाण, तन्वी ठाकुर, चंद्रशेखर माकुडे, अल्केश कांबळे, प्राजक्ता दात्ये, प्रतीक्षा प्रधान, दिप्ती कुलकर्णी, अभिप्राय कामठे, चिन्मय बेरी, सिद्धार्थ पुराणिक, संतोष माकुडे, गुरु आणि मित्र सागर लोधी, याशिवाय आमचे चार खंदे कार्यकर्ते सावनी दात्ये, तनिश शेंडे, अर्णव कुलकर्णी, अस्मी ढोकळे, सगळे प्रिय पालक, मायबाप रसिक प्रेक्षक, सुदर्शन रंगमंच चे व्यवस्थापक, सहायक, सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागेसाठी मदतीचा हात देणारे मा. नगरसेवक शंकर भाऊ पवार आणि अर्थातच आमचे लाडके आणि दंगेखोर बालकलाकार... तुम्हा सगळ्यां शिवाय माझं अस्तित्व काहीच नाही. तुम्ही सगळे आमच्या परिवाराचे भाग असल्याने आभार मानून तुम्हाला परकं मुळीच करणार नाही.
हो पण अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या बद्दल नक्कीच माफी मागिन. "चूकभूल द्यावी घ्यावी".
चला तर मग पुन्हा लवकरच भेटू....
छोट्या दोस्तांनो, शेवटच्या वाक्याला पूर्णविराम दिलेला नाही, म्हणजे याचा अर्थ असा की ही धमाल अशीच अविरत चालू राहणार बरका !
सदैव तुमच्या ऋणात असलेली, तुमचीच !
क ख ग !
🎭💙🥳