12/02/2021
गौरी देशपांडे : बहुपेडी साहित्यिक
- अवंती कुलकर्णी
मराठी साहित्यात कथालेखनाला, ललितलेखनाला विशेष असं स्थान आहेच, परंतू त्यातही स्त्री कथा-ललितलेखकांच्या साहित्याने त्यात जी मोलाची भर घातली आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. या साहित्यात पुरुषप्रधान जगात जगत असताना स्त्रियांचं असणारे स्वतःचं असं निराळं विश्व, स्वतःचं आयुष्य, आयुष्याकडं पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या दैनंदिन जगण्यात असणाऱ्या समस्या, त्या समस्यांचं त्यांच्या परीनं होत जाणारं आकलन, निराकरण, स्वतःचे आनंद, अस्तित्वाचा-स्वत्वाचा शोध घेणं, नातेसंबंध यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल या कथा ललित लेखनांत लिहिलेलं दिसून येतं. विसाव्या शतकातील मराठी साहित्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्यात तत्कालिन आधुनिक स्त्रीवादाची बीजेही दिसून येतात. आणि जेव्हा या प्रकारच्या साहित्यविषयावर बोललं -लिहिलं जातं तेव्हा गौरी देशपांडे हे नाव येणं, गौरी देशपांडेचं लेखन, तिच्या लेखनाचं झालेलं विवेचन इत्यादी एक अपरिहार्य टप्पा आहे.
कविता, दिर्घकथा, कथा, ललितलेखन, भाषांतरं अशा माध्यमांतून गौरीनं आपला संचार केला. त्यातही तिच्या कथा-ललितलेखनाच्या रचनात्मक बांधणीतील निराळे प्रयोग दिसून येतात. गौरीची भाषा, त्यातला ओघवतेपणा, सहजपणा, बऱ्याचदा धीट भाषा, ग्रामीण तसेच शहरी म्हणी-वाक्प्रचारांचा मुक्तपणे केलेला वापर यासाऱ्यामुळे गौरी एका ठरावीक वयातील वाचकवर्गाची अत्यंत आवडती लेखिका बनली.
शांतपणे, एकदम तबीयतसे वाचण्यासारखी तिची पुस्तकं आहेत. कोणीतरी सांगतं म्हणून आपणही वाचावं अशी ती नक्कीच नाहीत. तिची पुस्तकं वाचताना आपण खूप क्लिष्ट काही अनाकलनीय वाचतो आहे असं कधी वाटत नाही. सहज, ओघवतंच लिहिलेलं. जसं आपण बोलत असतो तसं लेखन. फार 'पुस्तकी', अति सजवलेली भाषाही नाहीच. त्यामुळे तिची पुस्तकं वाचताना मजा येते. कधी हसू येतं. कधी उत्सुकता ताणली जाते कधी अंतर्मुख व्हायला होतं.
आपल्या पोटाची जशी भूक असते तशी मेंदूचीही एक भूक असते असं मला वाटतं. आणि गौरीची पुस्तकं एका वयात ही भूक भागवणारी ठरतात .
Reading Gauri actually quenches your cerebral appetite.
"Image of the Saint in Modern English Literature" या विषयावर पुणे विद्यापिठातून संशोधन करून गौरी देशपांडेनी पीएच्डी केलं. गौरी देशपांडेचं लेखन प्रामुख्यानं मराठीत असलं तरीही तिच्या लेखनाला सुरुवात झाली ती इंग्रजीतून. 'बिटवीन बर्थस' हा तिचा पहीला कवितासंग्रह १९६८साली कलकत्तामधल्या पी. लाल प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झाला. त्यानंतर 'लाॅस्ट लव्ह' आणि 'बियाॅण्ड द स्लाॅटरहाऊस' नावाचे आणखी दोन कवितासंग्रह कलकत्तामधूनच प्रकाशित झाले. 'ओपिनियन', 'राईटर्स वर्कशाॅप मिसलनी', 'क्वेस्ट', या नियतकालिकांमधून गौरीनं१९६६ पासून लिहायला सुरुवात केली. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या श्रद्धांजलीपर लिहिलेल्या लेखापासून गौरीच्या मराठी लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८०मध्ये गौरीचं पहिलं मराठी पुस्तक एकेक पान गळावया हे आलं. तीन दीर्घकथा असणारं हे पुस्तक. आपल्या लेखनाबद्दल गौरी म्हणत असे "माझं लिखाण लघुकादंबरी आहे, की दीर्घकथा आहे हे मी सांगू शकत नाही. कादंबरी सुरु होते आणि थांबते, का ते मला सांगता येत नाही, म्हणून मी माझ्या साहित्याला लिखाण म्हणते."
मौज प्रकाशनगृहने काढलेल्या 'एकेक पान गळावया'ची आणि माझी भेट माझ्या वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी झाली. हे असं वय ज्यात तुम्ही जे पहाल, वाचाल, अनुभवाल त्याचा पगडा, प्रभाव किंवा छाप तुमच्यावर दीर्घकाळासाठी किंवा काहीवेळा कायमस्वरुपी असते. एकेक पान...च्या बाबतीत आणि म्हणून गौरीच्या बाबतीतही हे असंच काहीसं घडलं.
कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, आणि एकेक पान गळावया या तीन दीर्घकथा किंवा लघुकादंबऱ्या या पुस्तकात आहेत. नायिकाप्रधान लिखाण हे गौरीचं वैशिष्ट्य आहेच. या पुस्तकात स्वातंत्र्याची आसक्ती असणारी नायिका, दांभिकपणाला आणि म्हणूनच छोट्या बाबतीतही कराव्या लागणाऱ्या खोटेपणाला कडाडून विरोध करणारी नायिका हे एका अंशी गौरीचं स्वतःचंच प्रतिबिंब वाटतं. कारावासातून पत्रे मध्ये ती म्हणते "मुलगे आणि मुली यात भेद करायचा नाही, जी गोष्ट सामाजिकदृष्ट्या गुन्हा नाही, ती जर एखाद्याला आपल्या बुद्धिला पटली, करावीशी वाटली तर ती करू द्यायची. कुठल्याही प्रश्नाला 'मी सांगतो म्हणून' असं उत्तर तोंडावर फेकलं गेलं नाही, त्यामुळे आम्ही सर्व मुलं आपापल्या परीनं तऱ्हेवाईक, दंगेखोर, हट्टी बनलो." कादंबरीच्या नायिकेच्या तोंडून गौरी स्वतःच बोलत असावी असे वाटते. याला कारण सामाजिक भान असणाऱ्या आणि पुढारलेल्या, खुल्या विचारसरणीचं द्योतक असणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊन तिथे मोठं होणं हेही असावंच.
गौरीच्या लिखाणाला फक्त स्त्रीवादी म्हणण्यापेक्षा ते व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं लिखाण आहे असं म्हणणं योग्य ठरेल. सतराव्या वर्षी मुक्त स्त्री, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी स्त्री मनावार अर्थात अनेक वर्षं गारूड करून राहिली. आणि म्हणूनच मग एकेक पान नंतर गौरीची इतरही पुस्तकं मिळवून वाचण्याची ओढ लागली. मग 'निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग', 'दुस्तर हा घाट आणि थांग', 'तेरुओ आणि दूर काहीपर्यंत', ह्या दोन दोन लघु कादंबऱ्यांची पुस्तकं, 'मुक्काम', 'गोफ', 'उत्खनन' ह्या दोन निराळ्या लघुकादंबऱ्या, अनेक भाषांतरं सारं काही मिळवून वाचण्याची ओढ लागली. 'दुस्तर हा घाट' मधली नायिका नमू तत्वांशी तडजोड न करता, बुद्धिच्या मार्गाने जाऊन स्वतंत्रपणे मानानी जगण्यासाठी आपल्या प्राचाही त्याग करणाऱ्या बुद्धिवादी स्त्रीची प्रतीमा वाटते. तर थांग आणि मुक्काममधली कालिंदी ही आपल्या दिसण्यापासून असण्यापर्यंत सर्वच बाबतीत न्यूनगंड बाळगून, मुलगी मेल्याच्या दुःखात एकाकी कुढून, अगणित तडजोडी करून नवऱ्याबरोबर रहाणारी आणि इयन व दिमित्री या दोन निरातिशय प्रेम करणाऱ्या सोबत्यांच्या तिच्या आयुष्यात येण्यामुळं तिच्या आत्मविश्वासात, तिच्या विचारात बदल होऊन नवऱ्यापासून वेगळं राहून
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती जगू लागते. तेरुओच्या प्रेमात आकंठ बुडालेली पण कुठे थांबायचं हे पुरेपूर ठाऊक असणारी झोकून देणारी पण अत्यंत विचारी, प्रॅक्टिकल नायिका आपल्याहून बरेच मोठे असणारे 'जी' यांनाही पत्रं लिहित असते आणि आपल्या मनातली आंदोलनं कळवत असते.
गौरी वाचणं हा एक निरळा अनुभव आहे असं म्हणता येईल. खूप हिंडणे-फिरणे, खूप वाचणे, खूप सिनेमे पाहणे हे मेंदूला आणि पर्यायाने विचारांना सशक्त करणारे व्यायामच आहेत. शिपबिल्डर असणाऱ्या आपल्या नवऱ्याबरोबर गौरी खूप फिरली होती. निरनिराळे देश, तिथले लोक, तिथल्या चालीरिती या साऱ्याचं तिच्या लिखाणात प्रतिबिंब दिसतं. मग ते नमू वनमाळी जातात आणि अॅलिस्टरसारखा जीवश्च मित्र भेटतो ते अॅमस्टरडॅम असूदे किंवा इयन, दिमित्री, तेरुओ भेटतात ते जपान असूदे, किंवा मग दिमित्रीचा ग्रीकदेश असूदे. गौरीच्या लिखाणात तिथले लोक, त्यांचं खानपान, त्यांचे निरनिराळे समारंभ जसंकी जपानमधला साकुरा फेस्टिवल हे सारे बारीक सारीक तपशील तिच्या लिखाणात अगदी सहजीच येऊन जातात. तिच्या कादंबऱ्यांना परदेशातील पार्श्वभूमी लाभण्याबद्दल ती म्हणते,"अमेरिका, हाॅलंड, इटली, स्पेन, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जपान, कोरिया, चायना, हाँगकाँग, असा सारा जवळपास जगभर प्रवास झाला. नवरा शिपबिल्डर असल्याने परदेश प्रवास घडत राहिला. या प्रवासात बांधील नाती तुटल्यावर, नात्याचे सर्व संदर्भ तुटले असताना 'आपण कोण' ही जाणीव अधिक तीव्र झाली. स्वतःला जाणण्याची प्रक्रिया इथूनच सुरु झाली. परदेशात वावरही अर्थात अधिकच झाला त्यामुळे लिखाणाला परदेशातील पार्श्वभूमी लाभली असावी."
गौरी ज्या प्रमाणे देशीविदेशी फिरली त्याप्रमाणेच तिचं वाचनही अफाट असल्याचं, तिचं साहित्य वाचल्यानंतर समजतं. इलियट, ग्रॅहम ग्रीन, इशवूड, यांच्या साहित्याचा गौरीने अभ्यास केला होता. गौरीच्या वाचनाचे संदर्भ तिच्या लेखनातून येत राहतात, मर्ढेकर, पु. शि. रेगे, किट्स, शेक्सपियर, वर्डसवर्थ, ऑस्कर वाईल्ड, इ. इ.त्याचप्रमाणे गौरीने वर्ल्ड क्लासिक संगीतातही रुची दाखवल्याचं तिच्या लेखनातून समोर आलं आहे, बाख, मोत्सार्ट, विवाल्डी, कुमार गंधर्व, लुईस् इ. इ. चित्रकलेतही तिला काहीसा रस होता हे हुसैन, जहांगीर सबावाला, इ.इ. आणि सर्वामुळे तिला पाश्चात्य साहित्य, संगीत, यांमधे रुची आणि गती होती हे समजतंच पण त्याचं पुरेपूर आकलन होऊन तिच्या लिहिण्यात ते तिनं आणल्याचं दिसून येतं. तिचं वाचन अफाट होतं. आणि ते तिच्या लिहिण्यातून आपल्या समोर आलेच आहे. पाश्चिमात्य आचारविचारांचा तिच्या वागण्यावर खूप प्रभाव होता. हेही तिच्या लिहिण्यातून जाणवतेच. पण असं असतानाही तिच्या लिखाणात 'मध्यमवयीन, साधारण कुटुंबात वाढलेली वरवर सामान्य अशी भारतीय स्त्री' हे मध्यवर्ती पात्र असतं. अर्थात असं असलं तरी गौरीच्या नायिका कधीच शामळू, नेभळट दिसल्या नाहीत. साध्या असल्या तरी त्या 'क्लासी' वाटत राहील्या. गौरीचा एकुलता कथासंग्रह म्हणजे 'आहे हे असं आहे'. चोवीस कथांच्या या कथासंग्रहात असणाऱ्या कथा स्त्री, किर्लोस्कर, सत्यकथा, आयुध, कवडसे इत्यादी मासिकांमधून पूर्वप्रसिद्ध झाल्या होत्या. या संग्रहातली मध्यमवयीन स्त्रीची कौटुंबिक भाषा जशी असावी तशीच आहे. स्त्री म्हणून जगत असताना एक व्यक्ती म्हणून आणि एक स्त्री म्हणून अशा भूमिका पार पाडत असताना तिला आलेले भिन्नविभिन्न अनुभवांचा संचय म्हणजे या चोवीस कथा आहेत. यातील बहुतांश कथांच्या नायिका हेच त्या त्या कथांचं प्रमुख पात्र म्हणून समोर येतात. कथेच्या त्या निवेदिका असतात. सुशिक्षित, आत्मविशास-आत्मभान असणाऱ्या त्या असतात. आपल्या मातृभाषेशिवाय इतर भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या, जीवनात येत असणारी निरनिराळी अपयशं, केलेला संघर्ष, आलेल्या अडचणी या सर्व गोष्टी सहजीच पेलून नेणाऱ्या त्या असतात. न खचणाऱ्या, न डगमगणाऱ्या, आणा यशस्वी होणाऱ्या अशा त्या असतात. एकाअर्थी स्वतंत्र आणि बुद्धिवादी स्त्रियांची व्यक्तीचित्रे म्हणून हा कथासंग्रह विशेष आहे असं म्हणता येईल. विंचुर्णीचे धडे हे गौरीचं एकभेवं ललितलेखांचं पुस्तक आहे. ललित लेखसंग्रह असला तरीही गौरीच्या वास्तवावरच ते लेख आधारित आहेत.
ज्याप्रमाणे गौरीने मराठी आणि इंग्रजी साहित्यात लिखाण केले त्याचप्रमाणे अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा विशेष असा ठसा तिने उमटवला आहेच. रिचर्ड बर्टन यांच्या 'अरेबियन नाईट्स' चा गौरी देशपांडेनी केलेला मराठी अनुवाद हा अनुवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. सोळा खंडांत असणारं हे अरेबियन नाईट्स विशेष ठरण्याची काही ठळक कारणं आहेत त्यातलं एक म्हणजे अनुवाद करताना कुठेही काटछाट करून किंवा लैंगिक संदर्भ आले आहेत म्हणून ते वगळून पुढे जाणं तिनं आवर्जून टाळलं आहे. या अनुवादात केवळ मूळमजकुराचाच अनुवाद केला नसून मूळ लिखाणात ज्या तळटीपा आहेत त्यांचाही व्यवस्थित अनुवाद केलेला दिसतो. अनुवाद वाचताना हा अनुवाद नसून याच भाषेत मूळ लिखाण केलं गेलं आहे असं वाटणं हे त्या अनुवादाचं यश आहे असं मला वाटतं. गौरीने केलेल्या अरेबियन नाईट्सच्या अनुवादाबाबतही असंच वाटतं. ते इतकं परीपूर्ण वाटतं की मूळ लेखनात जे काही कथानक आहे त्याचा पुरेपूर अर्क-त्यातलं मर्म जसच्या तसं त्यात आलेलं आहे. अरेबियन नाईट्स खेरीज गौरीनं 'सात युगोस्लाव कथा', 'मेहमूद रहिमतुल्ला',यांचाही इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद केला. याचबरोबर गौरीनं मराठीतून काही उत्तम साहित्यकृती इंग्रजी भाषेत अनुवादीत केल्या. गौरीने, जयवंत दळवी यांची 'चक्र' ही कादंबरी, सुनिता देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' आणि शंकरराव खरातांचं 'तराळ अंतराळ' ही आत्मकथनं, अविनाश धर्माधिकारी यांचं 'अस्वस्थ शतकाची डायरी', विद्याधर पुंडलिक यांचं 'माता द्रौपदी' आणि सतिश आळेकर यांचं 'महानिर्वाण' ही नाटकं, आणि सुमित्रा भावे यांनी संपादित केलेल्या 'तवा चुल्यावर' ह्या कामगार स्त्रीयांच्या मुलाखतीच्या पुस्तकांचा अनुवाद मराठीतून इंग्रजीत केला आहे.
माणसाच्या भावनिक आणि वैचारीक दोन्ही बाजूंची गुंफण करून ते लिलया आपल्या लिखाणातून मांडणं यात गौरीचा हातखंडा होता. आणि कदाचित म्हणूनच अनेक लोकांना गौरी देशपांडेच्या कादंबऱ्या या भावनाप्रधान वगैरे वाटून त्यात न रमणं किंवा रमणं आवडत असावं. पण गौरी म्हणजे फक्त भावनाप्रधान लिखाण असं नाही. गौरीच्या लेखनशैलीचा विचार केल्यास हे लक्षात येऊ शकतं. गौरी देशपांडेचं साहित्यातून स्त्रियांच्या भावनेला स्पष्टपणे जागा मिळाली असलीते म्हणजे फक्त स्त्री-पुरुषांची विविद नाती, नात्यातली सुंदरता, किंवा चितारलेली सुंदर चित्रणं नव्हेत तर स्त्रीयांनी आणि पुरुषांनीही आपापल्या आयुष्यात कसे असले पाहीजे, त्यांची काही तत्व असली पाहीजेत हेही दिसून येतं. साहित्यात म्हणजेच लिखाण करत असताना रोजच्या बोलीभाषेला चकचकीत करून, मुलामा चढवून तिचा अस्सलपणा जाऊन ती बऱ्याचदा मांडली जाते. त्यामुळं बऱ्याचदा ती भाषा किंवा ते कथन कुणी बाई करतेय की कुणी बाप्या करतोय हे लक्षात येत नाही. गौरीची भाषा ही स्त्रीची भाषा आहे. म्हणी उखाणे वाक्प्रचार यांच्या वापरामुळं आलेली एक लय आहे गौरीच्या भाषेला. ही लयदार भाषा कधी रडवते, कधी भावनिक करते, कधी स्त्रीच्या हृदयीचं शल्य दाखवतेस कधी तिचा निग्रह दाखवते. वर म्हणल्याप्रमाणं गौरीच्या साहित्यातली प्रमुख व्यक्तीरेखा ही स्त्रीच असते, एक दुःखी पण हुशार स्त्री, जी नंतर आपल्या जीवनाबद्दल व्यापक आणि फलदायी असे विचार करते. यामुळंच गौरीच्या कथात्म साहित्यात स्त्रीची भाषा आहे. गौरीच्या लिखाणात इंग्रजी शब्द, वाक्य किंवा काही काही संभाषणं ही इंग्रजीतूनच घडलेली दिसतात. याला कारण कदाचित इंग्रजीवरील तिचं प्रभूत्व आणि त्या भाषेतूनही व्यक्त होण्याइतकं त्या भाषेचं तिला असणारं ज्ञान, अफाट असं इंग्रजी वाचन हेही आहेच. तेरुओमधली नायिका आपल्या भावना तेरुओपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजी काव्याचा आधार घेते हे याचं एक उदाहरण आहे.
नाटकात ज्याप्रमाणे नेपत्थ्याचा वापर वातावरणनिर्मितीसाठी केला जातो त्याचप्रमाणे कथात्म साहित्यात कथेचा आशय समजावा म्हणून वातावरणनिर्मिती केली जाते. परंतू गौरीच्या साहित्यात या गोष्टीला स्थान नाही. तिच्या पात्रांचे उगाच तपशील ती देत बसत नाही. ती सरळ कथेलाच हात घालते. बऱ्याच लेखकांप्रमाणे विषयावर पकड येइपर्यंत त्या कथेतल्या पात्रांचा परिचय, त्यांचे शैक्षणिक-राजकीय-आर्थिक आलेख रचत बसत नाही. त्याची गौरीला गरज वाटत नाही. आपल्या लिखाणाबद्दल गौरी म्हणते "माझ्या वाचकांनी माझी पात्रं समजून घ्यावीत, त्यांना समजावून सांगायचं माझं कर्तव्य नाही.ज्या स्त्रीयांबद्दल मी लिहलं त्यांच्या भूतकाळाचा धांडोळा मी कधीही घेतला नाही. त्या आज जशा आहेत तशा त्या का बनल्या यासाठी त्यांच्या पूर्वायुष्याची मी तपासणी केली नाही, माझ्या सर्व नायिकांच्या कथा विशीच्या आसपास सुरु होतात. त्या आधीच्या आयुष्यात काय घडले हे मी लिहित नाही." त्यामुळे काथा-कादंबरीतील आशयाच्या निमित्ताने स्थळ-काळाचे वर्णन याव्यतिरिक्त फारसे 'बिनकामाचे' वर्णन तिच्या लिखाणात येत नाही आणि म्हणूनच गौरी वाचताने कंटाळा येत नाही. गौरीची भाषा flowery नाही. खूप जास्त अलंकारीक नाही. जे जे जसंजसं मनात येत गेलं तसंतसं तिने लिहिलं असावं असंच वाटतं. त्यामुळे, कथा जरी असल्या तरी त्या ओढून ताणून बनवलेल्या कथा वाटत नाहीत. आणि म्हणूनच त्या खऱ्या वाटतात, पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात.
अनेकवेळा अगदी साध्या पद्धतिने ती असं काही सांगून जाते की आपल्याला त्यावर विचार करण्याची वेळ येऊन पडते याचं उदाहरण द्यायचं तर 'कारावासातून पत्रे' मध्ये गौरी एकेठिकाणी म्हणते, "हे बघ, दुःख ही अगदी लाचार आणि निरुपयोगी गोष्ट आहे. त्याला प्रतिष्ठा केवळ आपण त्याला तोंड कसं देतो, सहन कसं करतो, त्यावरुन येणार. नुसतं आपलं, चला, एक वर्षं दुःख भोगून बघू कसं वाटतं ते, मग पुन्हा परत चावी फिरवून सुखाकडे तोंड केलं, असं का आयुष्य असतं? त्या दुःखानं आपण, आपलं आयुष्य, आपलं आपल्या आयुष्याशी नातं या सगळ्यांत बदल झाला नाही तर मग एकामागून एक जाणारे दिवस घालवण्याचा एक दुसरा मार्ग यापलिकडे त्याला काय अर्थ राहिला? दर दोन वर्षांनी जैसे थे ला यायचं म्हणजे आत्मज्ञानाची बात सोडाच पण प्रगतीची गतीही शून्यच." दुःख वाट्याला आलं तर त्याचं तुम्ही काय करता यावर तुमचं पुढचं आयुष्य बेतलेलं असतं हे गौरी सांगते.
गौरी तिच्या काळाच्या पुढची लेखिका आहे असं म्हणतात. तशी ती होतीच हे आपल्याला गौरी वाचल्यावर समजूनही जातं.
गौरीच्या कुठल्याही कथेचं मध्यवर्ती पात्र जरी वर म्हण्टलं तशी साधीशीच बाई असली तरी गौरीने अगदी सहजच सर्व क्षेत्रात वावर केलाय असं वाटतं. म्हणजे असं की वनमाळीचं काॅर्पोरेट आयुष्य आणि हरीभाईंचं काॅलेजमधलं साधंच शिक्षकी वागणं, त्यानंतर गावी शेतातला त्यांचा वावर, त्यातही सखूबाई, काळू. जपान मधल्या टोकियो, क्योतो वगैरे ठिकाणांची वर्णनं, तेरुओच्या दिसण्यापासून ते तिथल्या होणाऱ्या साकुरा फेस्टिवल्स, तिथल्या मंदिरांच वर्णन, तिथल्या माणसांचं रहाणीमान. तिथं होणारे ऋतूबदल आणि त्याचा बाहेरून तिथे गेलेल्या लोकांवर होत असणारा परिणाम. आयरीश इयन, स्काॅटीश अॅलिस्टर, ग्रीक दिमित्री, आंगेलिका, ग्रीकदेशातली वर्णनं, तळेगावचं आश्रम, तिचं काॅटेज, मुंबई, कांचन, वृद्ध नाना, तिने केलेल्या तंतोतंत वर्णनामुळे गौरी खरोखरंच या सर्वठीकाणी जगली आहे असं वाटतं. निरनिराळे लेखक, निरनिराळं संगीत, भिन्नभिन्न प्रांत, देश या सगळ्याचा दांडगा अनुभव आणि निसर्गातही रमण्याची आवड विंचुर्णीत दिसून येते.
गौरीची भाषा सोपी आहे. आणि बहुतेक म्हणूनच ती जरा समजायला अवघड जाते अनेकांना.
वर म्हण्टलं तसं गौरी तिच्या काळाच्या पुढची लेखिका होती. आणि त्यामधे असणारे विवाहबाह्यसंबंध मग ते मैत्रीचे, प्रेमाचे कसेही असो, पण ते आपण वाचत आहोत हे सांगणंही आपल्या समाजात अनेकजणांना नको वाटतं म्हणून गौरीच्या कादंबऱ्या वाचतो हे सांगताना काहीजण आजही चाचरतात. गौरीच्या "नायिका" स्वतःच्या आनंदाचा विचार करतात. आणि केवळ म्हणूनही गौरीच्या लिखाणाला विरोध किंवा ते कसं चांगलं नाही असं सांगणारेही अनेक लोक आज आहेत.
गौरीच्या नायिकांना मनात खोलवर बोचणारी एकप्रकारची अतृप्तता असते तृप्तीची तहान वाढवणारी अतृप्तता वगैरे असं काहीसं क्लिशेड् बोलता येईल याबाबतीत. तिच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न असले, तरी ते टोकाचे नसतात. वरवर पाहताना सुस्थितीतील असणारी ती अस्वस्थ मात्र असते. तिच्या संवेदनाशील मनाला काहीतरी टोचत असत, काहीतरी सलत असतं. ते नक्की काय, हा प्रश्न आपल्याला फार त्रास देतो. कधी ती नात्यातला खरा अर्थ शोधत असते, तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचा.खूप हुशार असूनही गौरीची नायिका जगाच्या, व्यवहाराच्या पातळीवर यशस्वी नसते. तिला स्वतःच असं खास अस्तित्व नक्की असतं. आणि यावरच फिदा असणारे पुरुष तिच्या अवतींभोवती असतात. पण तिला मात्र वेगळ्याच कशाचीतरी जीवघेणी आस असते. त्या उत्तराच्या मागे कितीतरी वेळा गौरीची नायिका नायकाचे अस्तित्व, त्याचा सहवास नाकारते. गौरीच्या नायिका दिसायला सर्वसामान्य, कधी काळ्यासावळ्या, सुरकुतलेल्या, स्वतःच्या रुपाची फारशी काळजी किंवा पर्वा न करणाऱ्या असतात. मात्र त्या बुद्धिभान, आत्मविश्वासू असतात. त्या देखणेपणाच्या किंवा सुस्वरुप असण्याच्या जगन्मान्य चौकटीत बसत नसल्या तरी गौरीच्या नायकांना मात्र त्या देखण्या वाटत असतात ते या नायिकांच्या बुद्धि आणिआत्मविश्वासामुळं असेल असं वाटतं. आणि मग रुपा-रंगापेक्षाही एखाद्या बाईच्या ठायी असणाऱ्या बुद्धिकौशल्य, आणि इतर गुणांना वाखाणणाऱ्या या नायकांबद्दल आपसूकच एक विशेष कौतुक, कुतूहल वाटू लागतं. गौरीचे नायकही नायिकांइतकेच समजूतदार असतात. अगदी गुणी असतात. बायकोला किंवा मैत्रिणीला समजून घेणारे. गुणदोषासकट मनापासून केलेला स्वीकार आणि दोषांवर मात करायला नकळतपणे करत गेलेली मदत, नायिकेला तिच्या भीत्यांमधून मोकळं करणारे असे ते नायक आहेत. या साऱ्याबरोबरच ते मोकळ्या विचाराचे आहेत. आपल्या नायिकेचे काहीवेळा विचित्र वाटतील असे निर्णयही ते खूषीनं स्वीकारताना दिसतात. नायिकेवर फक्त प्रेमच करणारे किंवा पालकभावच असणारे हे नायक नसून नायिकेचा खऱ्या अर्थानं आदर करणारा सोबती असतात गौरीचे नायक. गौरीचे नायकांबद्दल 'आपल्यालाही असा एखादा मित्र असावा' असं बहुतेक साऱ्या मुलींना आणि 'आपणही असा मित्र बनलं पाहीजे' असं बहुतेक मुलांना गौरी वाचल्यानंतर किमान एकदातरी वाटून जातं.
गौरीची पात्रं स्वतंत्र संशोधनाचा विषय आहेत. तिची पात्रं, त्यांची भाषा, त्यांचे विचार, त्यांचं व्यक्त होणं, त्यांचं evolve होत जाणं, मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, आणि त्यात होणारे मनोव्यापार, सामाजिक बांधिलकी आणि स्वतःसाठी असणारी स्वतःची कर्तव्य आणिकही खूप काही. या सर्वांवर प्रबंध लिहिता येऊ शकतो. पण थोडक्यात सांगायचं तर गौरीची पात्रं जिवंत वाटतात त्यामुळे गौरी वाचत असताना कधीही आपण एकटेच आहोत असं वाटत नसतं. ती पात्रं डोळ्यांसमोर येत राहतात, ती स्वतःच तुमच्याशी बोलू लागतात. दिमित्री, तेरुओ, इयन, वनमाळी, अॅलिस्टर, नंदन, जनक, माधव, फारुख, जसू, आनंद, कालिंदी, नमू, जी, ती, वसू, शमी, मिमी... हे सर्वजण त्यांच्या आयुष्याबद्दल तुमच्याशी बोलतात असंच वाटतं. कुठलीही एक व्यक्ती दुसरीसारखी नाही.
गौरीच्या कथांमधून प्रेम कळत जातं, मैत्र समजत जातं. आपणही आपल्याच नकळत आपल्यावर प्रेम करायला लागतो किंवा आपल्या स्वतःसाठी जगायला लागतो कालिंदीसारखं. आणि मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे.
स्त्रीनं स्वतःबद्दल विचार केला पाहीजे हे गौरीच्या कथा सांगतात. महर्षी ते गौरीमधे गौरी एका मुलाखतीत म्हणते, "स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती हा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे, ही काही पाकक्रिया नाही. प्रत्येक बाईला स्वतःच्या बाबतीत गोष्टी ठरवण्याची मुभा असली पाहीजे. मुक्ती म्हणजे काय हवं आणि काय नको हे ठरवता येणं." गौरीच्या नायिका अश्या आहेत, आणि त्या वाचताना आपणही आपणाला आपलं स्वातंत्र्य मिळवता आलं पाहीजे याचा विचार करतो, हे या लेखिकेचं श्रेय आहे असं वाटतं.
(समदा दिवाळी २०१८ मध्ये प्रकाशित)